खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील आल्ड्रफ केमिकलच्या नावे असलेल्या बंद प्लॉटमध्ये रविवारी (दि.९) दुपारी दोन वाजता भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
जवळपास दीड तासांनी औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलातील जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ज्या प्लॉटमध्ये आग लागली तेथे कोणताही प्लांट नसल्यामुळे मानवी जीवनाला धोका पोहोचला नसला तरी दुसऱ्या कंपनीने तेथे ठेवलेल्या साहित्याचे मोठे नुकसान झाले.
कोकणातील रासायनिक कारखाने असलेली औद्योगिक वसाहत म्हणून लोटे औद्योगिक वसाहत ओळखली जाते. रविवारी दुपारी अल्ड्रफ केमिकलच्या प्लॉटमध्ये आग लागली. या प्लॉटवर हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीने आपले साहित्य ठेवण्यासाठी तो प्लॉट भाड्याने घेतला होता. त्यामुळे या आगीत या कंपनीच्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले. औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. दीड तासांनी आग नियंत्रणात आली.