पाली : माझे प्राथमिक शिक्षण या शाळेत झालेले असून ती शाळा ही एक आदर्श झाली पाहिजे. कारण या शाळेत आल्याबरोबर माझ्या शालेय जीवनातील अनेक आठवणी जाग्या झाल्या ऐवढी ताकद आजही यात आहे हे वैशिष्ट्य आहे.जि.प.च्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त पटसंख्या कशी असावी याचा आदर्श या पाली शाळेकडून घेतला पाहिजे त्यामुळे भविष्यात मी या शाळेला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाची आदर्शवत रोल मॉडेल शाळा होण्यासाठी निश्चितच सहकार्य करेन असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
पाली येथे आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन काल संपन्न झाले.यावेळी प्रमुख पाहुणे व माजी विद्यार्थी म्हणुन पालकमंत्री उदय सामंत,शिवसेना तालुकाप्रमुख महेश महाप ,पालीचे उपसरपंच संतोष धाडवे, पोलीस पाटील अमेय वेल्हाळ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे,अॅड.सागर पाखरे, श्रीकांत राऊत,मंगेश पांचाळ,प्रमोद ठीक,विनोद चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, प्राथमिक शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या साठी अत्यंत महत्वाचे असल्याने शिक्षकांनी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने विशेष लक्ष्य दिले पाहिजे जेणेकरून आपल्या जि.प.शाळेतील विद्यार्थी हे इस्त्रो, नासा, सारख्या परीक्षा देत आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी मी मराठी भाषा मंत्री म्हणुन तुमच्या पाठीशी कायम आहे. तसेच या शाळेच्या मैदानासाठी मी १५ लाख रुपयांचा निधी देत असून त्यातून शाळेत क्रिडा संकुल उभे राहील असे सांगितले.
या स्नेहसंमेलनात मुख्याध्यापक जनार्दन मोहिते यांनी मंत्री श्री. सामंत यांच्यावरील पोवाडा सादर केला. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून पाली शाळेतील महिला शिक्षक ममता सावंत,श्रद्धा रसाळ, नेहा जाधव, श्रुती वारंग यांचा तसेच साठरे बांबर शाळा क्र.२ मधील विद्यार्थीनी कार्तिकी सागवेकर हिची इस्त्रो,नासा साठी निवड झाल्याबद्दल मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक मारुती घोरपडे, दिगंबर तेंडुलकर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी आपले नृत्य, नाटिका व अन्य कलाविष्कार सादर केले.