रत्नागिरी:- कोकणातील देवराय यांच्या जमिनी पूर्व व देवस्थानांच्या नावावर कराव्यात, या मागणीसाठी रत्नागिरीत उद्या सोमवारी (दि. १० मार्च) घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
कोकणातील अनेक देवस्थानांच्या देवराई तथा देवरहाटी जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांमधून देवस्थानांची नावे देवस्थानांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता बेकायदेशीररीत्या कमी करण्यात आल्या आहेत. त्या पुन्हा देवस्थानांच्या नावे कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्त, भाविक – भक्त, हिंदू यांच्या वतीने सोमवारी सकाळी १० वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात देवराई तथा देवरहाटी असून ते धार्मिक महत्त्व असलेले पवित्र उपवन असते. या देवराई त्यामधील स्थापित देवांच्या नावावर असतात. या जमिनी पारंपरिक स्वरूपात देवस्थानांच्या अधिपत्याखाली असून त्या धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. देवराई तथा देवराहाटीच्या जमिनी केवळ धार्मिक उपासनेसाठीच नव्हे, तर पर्यावरणीय समतोल राखण्यासाठीदेखील आवश्यक आहेत. अनेक वर्षांपासून या जमिनी देवस्थानांच्या ताब्यात होत्या आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या धार्मिक भावना आणि परंपरा जपल्या जात होत्या. मात्र शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा स्थानिक जनतेची कोणतीही समुपदेशन प्रक्रिया न करता या जमिनी शासनाच्या नावे केल्यामुळे ग्रामस्थांच्या धार्मिक व सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन झाले असून याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. देवराई तथा देवरहाटी जमिनी पूर्ववत देवस्थानांच्या नावे करण्यात याव्यात, या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी यांनी दिली.