नौकेवरील 8-9 लाखांचे एलईडी साहित्य जप्त
जप्त केलेली नौका मिरकरवाडा बंदरात
रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मासेमारीवर अंकुश आणण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार कार्यान्वित झालेल्या रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अवघ्या १२ तासात अनधिकृत मासेमारी करणारी दुसरी नौका पकडली आहे.
जयगड समुद्रात शुक्रवारी रात्री एलईडी मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौकेवर कारवाई केल्यानंतर शनिवारी आज दि. 8-3-2025 रोजी सकाळी 11.00 वाजता मत्स्यव्यवसाय विभागाने महालक्ष्मी नौका IND – MH-4-MM-2813 ही नौका ताब्यात घेतली. सदर नौकेची झडती घेतली असता नौकेवर LED बल्ब व जनरेटर आढळून आले.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अधिनियम 2021 अंतर्गत एल.ई. डी. नौकेवर कारवाई करण्यात आली आहे.
सदर नौका जप्त करून मिरकरवाडा बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर मासळीचा आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. अंदाजे 8-9 लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. सदर नौकेवर प्रतिवेदन दाखल करण्यात आले आहे व सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे.