रत्नागिरी:- खल्वायन रत्नागिरी या संस्थेची ३११ वी मासिक संगीत सभा आज, शनिवार ८ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे. नेहमीप्रमाणेच सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात कै.अरुअप्पा जोशी स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजऱ्या होणाऱ्या या मैफलीमध्ये पं. सुरेश तळवलकर यांचे पट्टशिष्य ईशान परांजपे (पुणे ) यांचे तबला सोलोवादन व डॉ. सुधांशु कुलकर्णी व डॉ. चैतन्य कुंटे यांचे पट्टशिष्य ऋतुराज धुपकर (पुणे) यांचे हार्मोनियम सोलोवादन होणार आहे.
ईशान परांजपे यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांच्या नागपूर या शहरामध्ये भास्कर वाशिमकर यांच्याकडून तबला वादनाचे शिक्षण घ्यायला सुरवात केली. त्यानंतर गेली १७ वर्षे ते पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे पुणे येथे त्यांच्या गुरुकुलात तबला वादनाचे शिक्षण घेत आहेत. शास्त्रीय गायनाबरोबरच ते कथ्थक नृत्य प्रकार, वेस्टर्न क्लासिकल, सेमी क्लासिकल, फ्युजन, लाइट म्युझिक, गझल, ठुमरी आणि बॉलीवूड या सर्व संगीतप्रकारांना तेवढ्याच सफाईदारपणे साथसंगत करीत असतात. पं. सुरेश तळवलकर यांच्याबरोबर त्यांच्या तबला सोलोवादन कार्यक्रमात अनेक ठिकाणी साथ संगत केली आहे. सवाई गंधर्व, NCPA, लोणावळा फेस्टिवल, इत्यादी ठिकाणच्या नामवंत संगीत महोत्सवातून त्यांनी तबला साथ संगत केली आहे. जर्मनीत अनेक वेळा जर्मन सिंफनी ऑर्केस्ट्रामध्ये तबला साथ संगत केली आहे.
ऋतुराज रघुनाथ धुपकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून वडिलांकडून हार्मोनियम वादनाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर बेळगावचे डॉ. सुधांशु कुलकर्णी व ललित कला केंद्र, पुणे येथे डॉ. चैतन्य कुंटे यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतले. गांधर्व महाविद्यालयाची विशारद ही पदवी ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहेत. अनेक स्पर्धांमधूनही त्यांनी घवघवीत यश संपादन केले असून प्रख्यात अभिनेत्री व नर्तिका शर्वरी जमेनीस यांना कथ्थक नृत्य प्रकारात हार्मोनियमची साथसंगत केली आहे. पं. अरविंदकुमार आझाद, पं. डॉ. अनिष प्रधान यांच्या सोलो तबलावादनात साथ संगत केली आहे.
रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.