चिपळूण:- आगामी उन्हाळ्याच्या हंगामात चिपळूण तालुक्यासाठी प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवला आहे.
त्यासाठी १ कोटी ३४ लाख खर्च अपेक्षित आहे. तालुक्यातील ५२ गावे आणि २४७ वाड्यांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत गतमहिन्यात पंचायत समितीत टंचाईग्रस्त कृती आराखडा तयार करण्यासाठी बैठक झाली. यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रस्तावित टंचाईग्रस्त आराखड्यात १३ गावांमधील १७ वाड्यात नवीन विंधन विहिरींना मंजुरी दिली आहे. त्यासाठी २० लाख ४० हजार रुपयांची तरतूद केली आहे. एका गावातील तीन वाड्यांमध्ये विंधन विहिरीची दुरुस्ती होणार आहे. तालुक्यातील १४ गावात १५ वाड्यांतील पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी ८९ लाखांची तरतूद आहे. ४३ गावातील २३१ वाड्यात अवघ्या २ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २८ लाख १० हजारांची तरतूद करण्यात आली आहे.