दाभोळ : दापोली तालुक्यातील आगरवायंगणी येथे दोन डंपरच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप गंगाराम निवणकर हे ६ मार्च २०२५ रोजी रात्री १०.१५ च्या सुमारास त्यांचा डंपर (MH 08-AP-2785) स्वतः चालवत पन्हाळेकाझीहून वाळू घेऊन येत होते. त्यांच्या सोबत संदेश किसन येलवे देखील होते.
आगरवायंगणी बौध्दवाडी फाट्याजवळ समोरून येणारा ऋषिकेश सुरेंद्र बारे यांचा डंपर (MH08-AP-1538) भरधाव वेगाने येत होता.
निवणकर यांनी त्यांचा डंपर रस्त्याच्या कडेला थांबवून बारे यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, बारेने निष्काळजीपणे डंपर चालवत निवणकर यांच्या डंपरला धडक दिली.
या अपघातात निवणकर दोन डंपरच्या मध्ये चिरडले गेले आणि अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
संदेश किसन येलवे यांच्या तक्रारीवरून दाभोळ सागरी पोलिसांनी ऋषिकेश सुरेंद्र बारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत.