देवरुख ( प्रतिनिधी ):- श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय, देवरुख येथे वृत्त निवेदिका, सुप्रसिद्ध लेखिका व कथाकार श्रद्धा वझे यांच्या ‘कथा अभिवाचन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयाचा स्थापना दिन आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने आयोजित केलेल्या या अभिवाचन कार्यक्रमाव्दारे चौथे पुष्प गुंफले गेले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने मान्यवरांनी केली. यानंतर श्रद्धा वझे यांचा यथोचित सत्कार सौ. अनघा लिमये यांनी केला. ‘उत्कृष्ट बालवाचक’ म्हणून स्नेहल पवार, पौर्णिमा पडये, दूर्वा मुंडेकर व धनश्री थोटम यांना श्रद्धा वझे यांनी सन्मानित केले.
श्रद्धा वझे यांनी कथा या साहित्यिक प्रकाराची माहिती देताना कथेचा झालेला उगम, कथीका या संस्कृत शब्दाबाबतची माहिती, वाचिक अभिनय म्हणजे कथा याबाबत भाष्य केले. भारत म्हणजे कथांचा देश याबाबत विवेचन केले. वृत्त निवेदनातील अनुभवही थोडक्यात स्पष्ट केले. श्रद्धा वझे यांनी या अभिवाचन कार्यक्रमात स्वलिखित कथांचे सादरीकरण केले. ‘दिशा जगण्याची’ ही तृतीयपंथीयांचे भावविश्व उलगडणारी कथा सर्वप्रथम सादर केली. आपल्या देशातून परदेशात स्थलांतरित होणाऱ्या बुद्धिवंतांच्या संदर्भातील ‘रिबाँड’ ही कथा, सोशल मीडियाची आभासी दुनिया आणि माणसातील संवाद हरवत चालल्याची वास्तवता ‘विण’ या बोधकथेतून व्यक्त केली. ‘निवडणूक’ या कथेतून राजकारणातील स्वार्थ व संघर्ष रसिकांसमोर उलगडला.
अतिलघु कथा या अतिशय कमी शब्दात मांडलेल्या कथाही सादर केल्या. ‘जीवन’ या कथेतून मानवी जीवन मूल्य व मानवी संघर्ष उभा केला. न्यू इयर, गुड न्यूज, अर्थ, सती व बोट या सर्व ५ वाक्यातील कथा आशयपूर्ण होत्या. श्रद्धा वझे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत आणि धीर गंभीर आवाजात कथांचे अभिवाचन करून रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर यांनी केले. तर प्रा. धनंजय दळवी यांनी वाचनालयाचा स्थापना दिन आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित ४ दिवशीय साहित्यिक कार्यक्रमांचा आढावा व फलित याबाबत माहिती देऊन सर्व कार्यक्रमाला सहाय्य करणाऱ्या हितचिंतकांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारणी सदस्यांसह वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.