रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव एमआयडीसी, काळबादेवी सुरुबन या दोन ठिकाणी गुरुवारी वनव्या मुळे आग लागली. दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर अग्निशमन यंत्रणेच्या माध्यमातून नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र काळबादेवी सुरुबनात लागलेल्या आगीने मोठे नुकसान झाले आहे.
कुवारबाव एमआयडीसी येथे गवताला आग लागल्याची माहिती येथील कर्मचारी प्रशांत सावंत यांनी एमआयडीसी अग्निशमन यंत्रणेला कळवली. एमआयडीसीच्या अग्निशमन यंत्रणेने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. महामार्गाजिक घराजवळ आग झपाट्याने पसरत असल्याचे अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. या आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच महावितरणच्या कार्यालया समोर देखील लागलेली आग विझवण्यात आली. प्रचंड उष्म्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुसऱ्या घटनेत काळबादेवी येथील दत्त मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या सुरुबनाला गुरुवारी आग लागल्याची घटना घडली. सकाळी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. मात्र काही वेळाने ही आग पुन्हा पेटली. पुन्हा लागलेल्या आगीने सायंकाळी रुद्रावतार धारण केला होता. पुन्हा आग लागल्याचे निदर्शनास येताच इथल्या ग्रामस्थानी पुन्हा अग्निशमन यंत्रणेशी संपर्क साधला. सायंकाळी पुन्हा लागलेल्या आगीत सुरूची अनेक झाडे जळून भस्मसात झाली.