दापोली – तालुक्यातील आंजर्ले तरीबंदर येथे मासेमारी नौका उभ्या करून ठेवण्यासाठी ठेवलेली लाकडे आणि जवळच असलेली एक फायबर बोट आणि चार छोट्या होड्या अज्ञाताने लावलेल्या आगीत जळून खाक झाल्या.
यामध्ये मच्छीमारांचे सुमारे ५ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणाची तक्रार पाजपंढरी हर्णै बंदरातील मच्छीमारांनी हर्णै पोलिस दूरक्षेत्रात केली आहे. आंजर्ले तरी बंदर येथे वादळापासून संरक्षण म्हणून नौका उभ्या केल्या जातात. या ठिकाणी कचोऱ्यांचा (कचोरे म्हणजे किमान २२ फूट लांब आणि ६ इंचीची गोलाई असलेले लाकडाचे ओंडके) आधार देऊन नौका उभ्या केलेल्या असतात. या नौका मासेमारीला गेल्यावर हे कचोरे त्यात ठेवण्यात येतात.
१ मार्चला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या मच्छीमार बांधवांचे हे बोटीचे कचोरे जाळण्यात आले. या आगीमध्ये सुमारे एकूण सलग असलेले १४ कचोरे जाळण्यात आले. एक कचोऱ्याची किंमत ३० हजार असल्याने या प्रकारामध्ये या मच्छीमार बांधवांचे एकूण ४ लाख २० हजारांचे नुकसान झाले आहे.
तसेच त्याच दिवशी खाडीमध्येच मासेमारी करणाऱ्या छोट्या मच्छीमारांच्या छोट्या होड्या (डिंगी) देखील जाळण्यात आल्या. त्यामुळे मच्छीमार संताप व्यक्त करत आहेत. एका छोट्या होडीची किंमत सुमारे ४५ हजार आहे अशा ३ डिंग्या जाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे १ लाख ३५ हजारांचे नुकसान झाले आहे.
१ तारखेला आग लागल्याची घटना घडल्यानंतर मच्छीमार बांधवांनी हर्णै पोलिस दूरक्षेत्रामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पुन्हा मंगळवारी (ता. ४) या दिवशी देखील रात्री उशिरा पुन्हा एकदा एका छोट्या बोटीला आग लागली. त्यात ती बोट जळून खाक झाल्या.
ज्या वेळी आग लागली तेव्हा आग नियंत्रणाक आणण्यासाठी आजूबाजूच्यांनी मच्छीमार बांधवांना साधा फोनही केला नाही. असे येथील मच्छीमारांनी सांगितले. याबाबत नुकसानग्रस्तांनी हर्णै पोलिस दूरक्षेत्रामध्ये तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक डी. डी. पवार, हेडकॉन्स्टेबल संतोष सडकर आणि दिलीप नवाले करत आहेत.
यांचे झाले नुकसान
या घटनेमध्ये अनंत पांडुरंग चोगले -२ कचोरे, जयेंद्र पांडुरंग चोगले- २ कचोरे, रत्नाकर गौऱ्या चोगले-२ कचोरे, रोहिदास दामू चोगले-१ फायबर बोटे, नारायण दामा चोगले-१ कचोरा, जगदीश दामोदर चोगले-१ कचोरा, आत्माराम महादेव चुनेकर-१ कचोरा, गणेश धर्मराज चोगले – २ कचोरे, हरेश्वर लखमा पाटील -१ कचोरा, कृष्णा लखमा चोगले-२ कचोरे, पांडुरंग जाया दोरकुळकर १ फायबर बोट या मच्छीमारांचे नुकसान झाले आहे.