रत्नागिरी:- पोलिस विभागाचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणे चांगले असून लवकरच मॉडर्न सोशल मिडिया लॅब सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी डिपीडिसी मधून निधीचेही सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात आले आहे.
आज सोशल मिडियाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या लॅबमधून 24 तास सोशल मिडीयावर वॉच ठेवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नसल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाडही उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या 7 कलमी कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मी आलो असून सर्व जिल्हांच्या पोलिस ठाण्यांमध्यील सर्व कामे स्वच्छतेची, नुतनीकरणाची कामे सुरु आहेत. कोकण विभागात अमली पदार्थ हे जर कोस्टल मार्गाने येत असतील तर त्यासाठी नेव्ही, कोस्टल पोलिसांची गस्त सुरु आहे. सायबर क्राईम सुध्दा तंत्रज्ञानवर आधारित आहे. एकेकाळी क्रेडिट कार्ड फसवणूकीनंतर आता गुन्हेगार डिप फेक व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हे करत आहेत. त्यासाठी सायबर पोलिसांचे हैद्राबाद, कलकत्ता, नोयडा येथील राष्ट्रीय स्तरावरच्या ट्रेनिंग संस्थेतून सतत ट्रेनिंग सूरु आहे. तसेच महाराष्ट्रातील नाशिक येथील पोलिस अॅकॅडमीतूनही पोलिसांचे ट्रेनिंग सूरु आहे. सायबर गुन्हे जितके पुढे जात आहेत. तेवढाच पोलिस विभागही अद्ययावत होत आहे. तसेच जनजागृती करुनही सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी दिली.