महामार्गाचे काम करणारा ठेकेदार बालंबाल बचावला
लांजा/अजित गोसावी:- मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचे आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी ब्रेक फेल झाल्याने हा कंटेनर महामार्गालगत पलटी झाला. या अपघातात रस्त्याचे काम करणारे ठेकेदार चंद्रकांत गुरव हे बालंबाल बचावले आहेत. गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, (जीए.०५.टी.६५४६) या क्रमांकाचा कंटेनर हा मुंबईहून गोव्याच्या दिशेने चालला होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा कंटेनर आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी आला असता कंटेनरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या हा कंटेनर आंजणारी घाटातील तीव्र उतारावर पलटी झाला. याच दरम्यान आंजणारी बस स्टॉप या ठिकाणी रस्त्याचे काम करणारे चंद्रकांत गुरव हे रस्त्याच्या कामासाठी लागणारी खडी खाली करण्यासाठी थांबले होते. आपली मोटरसायकल रस्त्याच्या कडेला सावलीत उभी करून ते त्या मोटरसायकलवर बसले होते. मात्र अचानक ब्रेकफेल झालेल्या कंटेनरचा मोठा आवाज आल्याने त्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे ते बालमबाल बचावले.
मात्र कंटेनरने त्यांच्या मोटारसायकलला धडक देत कंटेनर मोटारसायकलसह महामार्गालगत पलटी झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून चंद्रकांत गुरव हे या अपघातात बालमबाल बचावले आहेत. अपघातानंतर जखमी झालेल्या चालकाला ग्रामस्थांनी बाहेर काढले. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविल्याची माहिती मिळाली.