खेड ः तालुक्यातील सुकवली येथे बुधवारी दि. 5 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या गाडीचा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दोन्ही वाहनातील विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना तातडीने भरणे नाका येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
खेडमध्ये बुधवारी 5 रोजी सायंकाळी टेम्पो ट्रॅव्हलर बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी सुकिवली येथील रेल्वे पुलाजवळ थांबली होती. यावेळी स्कूलबसला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या रिक्षाने धडक दिल्यामुळे अपघात घडला. या भीषण धडकेत दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, बसमधील आणि रिक्षातील विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.
या अपघाता सार्थक मनवळ, स्वरूप गुजर, साई मोरे, विराज गवाडे हे गंभीर जखमी झाले. दीपक माने या विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली. शहरातील दोन नामांकित शाळांचे शिक्षक, शाळेचे पदाधिकारी आणि संस्थाचालकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.
पालकांमध्ये घबराट …
या घटनेने पालकांमध्ये घबराट पसरली होती. शाळेच्या बसेस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी करून आवश्यक कागदपत्रे असणार्या वाहनांनाच परवानगी देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पालकांकडून होत आहे.