कोल्हापूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री सोडले. वाशिम जिल्ह्यापर्यंतचा तब्बल सहाशे किलोमीटरचा प्रवास लांबचा आहे, आपण त्या पदाला योग्य प्रकारे न्याय देऊ शकणार नाही, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
मंत्री मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची अनेक वर्षांची इच्छा होती. २०१९ला अनपेक्षितपणे सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना ग्रामविकाससारखे वजनदार खाते मिळाले, त्याच्या जोडीला कोल्हापूरचे पालकमंत्री पद हवे होते; पण काँग्रेसने हक्क न सोडल्याने त्यांना अहमदनगरचे पालकमंत्री पद मिळाले. अडीच वर्षे तिथेही त्यांनी काम केले. परंतु, तिथेही ते फारसे रमले नव्हते. महायुतीचे सरकार आल्यावर त्यांना ११ महिन्यांसाठी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळाले.
महायुतीचे सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रह धरला; पण शिंदेसेनेचे आमदार जास्त असल्याने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडली.