मुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.शासकीय आणि शालेय कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे.
या निर्णयाने राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नागरिक, विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार?
सदर निर्णयामुळे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहावा लागणार आहे.साध्या अर्जावर तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच दहावी,बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांना प्रतिज्ञापत्र लागते त्यासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार आहे.सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.
500 रुपयांचे मुद्रांक शुल्क कोणत्या कागदपत्रांना लागते?
1) जात पडताळणी प्रमाणपत्र
2) उत्पन्नाचा दाखला
3) रहिवासी प्रमाणपत्र
4) नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट
5) राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह
6) शासकीय कार्यालयात देण्यात येणारे प्रतिज्ञापत्र
पालकांचा वाढत्या खर्चावर आक्षेप
पूर्वी केवळ 100 रुपयांच्या मुद्रांकासाठी साधारणतः 250 रुपये खर्च येत असे, परंतु हा खर्च अचानक 1000 रुपयांपर्यंत वाढल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी होती. शैक्षणिक प्रक्रियेसाठी हा अतिरिक्त खर्च परवडणारा नसल्यामुळे सरकारने त्वरित काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून, आता विद्यार्थ्यांना मुद्रांक शुल्कातून सूट देण्यात आली आहे.