चिपळूण : शहरातील डीबीजे महाविद्यालयातून इयत्ता बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी तालुक्यातील सती येथे उघडकीस आली. ती कुटुंबीयांसमवेत सती येथे वास्तव्यास होती. याबाबत चिपळूण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अंजली रवींद्र निशाद (१८, सती, मूळ-उत्तर प्रदेश) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
शहरातील डीबीजे महाविद्यालयात अंजली बारावीमध्ये होती. निशाद कुटुंब हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून, ते काही वर्षापासून सती येथे राहत आहेत. अंजलीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर चिपळूण पोलिस स्थानकाला माहिती देण्यात आली. पोलिस लगेचच दाखल झाले. अंजलीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचे कारण पुढे आलेले नाही. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश महाडिक करत आहेत.