मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला मिळणार असून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भास्कर जाधव हे आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते असतील. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना दावा करणार असून तशा आशयाचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आलं आहे.
तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावं अशी मागणी काँग्रेसने केल्याची माहिती आहे.
राहुल नार्वेकरांचा निर्णय अंतिम
विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ हे महाविकास आघाडीतील तीनही पक्षाकडे नाही. त्यामुळे आतापर्यंत विधानसभा विरोधी पक्षनेत्याचा निर्णय झाला नव्हता. परंतु आता ठाकरे गटाच्या वतीने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला आहे. त्यावर अंतिम निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.
अडीच वर्षांचा फॉर्म्युला?
विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर ठाकरे यांची शिवसेना दावा करत असेल तर काँग्रेस विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार असल्याची माहिती आहे. तर विधानसभा विरोधी पक्षनेतेपद अडीच-अडीच वर्ष मिळावे अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जर ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा आणि काँग्रेसला विधान परिषद विरोधी पक्षनेते पद मिळत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या अडीच वर्षाची मागणी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भास्कर जाधवांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास
1992 – रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अध्यक्षसुद्धा.
1995 – चिपळूण मतदारसंघाचे आमदार.
1999 – चिपळूण मतदारसंघाचे आमदार.
2006 – विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती.
2009 – गुहागर मतदारसंघातून आमदार.
2009 – नगरविकाससह 9 खात्यांचे मंत्रिपद.
2009 -रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद.
2009 – राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद.
2013 – पुन्हा वन खात्यासह सात खात्यांचे मंत्रिपद.
2014 -विधानसभेवर आमदार.
2019- विधानसभेवर आमदार.
2024 – विधानसभेवर आमदार.
2024 -शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड.
2025- विधानसभेचे विरोधी पक्षनेते