संगमेश्वर : स्तनदा व गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्याच्या पाकिटात मृत सडलेला उंदीर मिळाल्याचा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव मुरधीर आळीतील अंगणवाडीत घडला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
येथील मदतनीस प्राजक्ता सावंत यांनी हा प्रकार कोंडगाव सरपंच प्रियांका जोयशी यांना कळविला. त्यांनी त्वरित देवरुख गटविकास अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला पोषक खाद्य आहार म्हणून या धान्याचे वितरण २० ते २५ महिलांना केले जाते. सोमवारी मुरधीर आळीतील अंगणवाडीत आलेल्या धान्यामध्ये मृत उंदीर सापडला.
धामापूर बीटच्या पर्यवेक्षिका व्हटकर व साखरपा बीटच्या पर्यवेक्षिका रोशनी पेजे यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या उपस्थित पंचनामा केला. या प्रकारामुळे परिसरात पोषण आहार वाटप थांबविण्यात आले आहे. जर असे प्रकार घडत असतील, तर आम्हाला आहार नको, अशी संतप्त भावना ग्रामस्थ अमित जाधव यांनी व्यक्त केली.
लाभार्थ्यांना असा पोषण आहार देण्यापेक्षा त्यांच्या खात्यावर निधी जमा करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या प्रकाराला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही लोकांनी यावेळी केली. यावेळी कोंडगाव सरपंच प्रियांका जोयशी, उपसरपंच श्रद्धा शेट्ये, सदस्या नयना शिंदे, माजी उपसरपंच प्रवीण जोयशी, अमित केतकर, अमित जाधव, योजना लोटनकर, प्राजक्ता सावंत, नयन गोंधळी, ज्योती डंबे, भरत माने, संतोष पोटफोडे उपस्थित होते.