गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांची रोखठोक भूमिका
रत्नागिरी:-पैशांच्या जोरावर होणार राजकारण आगामी काळात संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला मारक ठरेल. परिणामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांनी नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या आमिषाला बळी न पडता आपल्या भागाचा खरोखर विकास करू शकेल अशाच लोकांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी केले आहे.
हल्ली राजकारणात पैसे देऊन मत विकत घेण्याचा पायंडा पडत आहे. हा प्रकार ग्रामीण भागाच्या विकासासाठी घातक आहे. अगदी गाव पातळीवर सुद्धा मतासाठी पैसे देऊन मत विकत घेऊ पाहणारे दलाल पिसाळले आहेत. हे दलाल स्वतःची घर भरण्यासाठी गावांचे भविष्य उध्वस्त करत आहेत.यातील काही दलाल हे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पैशांच्या थैल्या घेऊन पुन्हा गाव वाड्या विकत घेण्यासाठी येतील. तेव्हा सुजान सर्वसामान्य जनतेने अशा दलांना त्यांचा घरचा रस्ता दाखवावा आणि खऱ्या अर्थाने गावांच्या विकासाचे व्हिजन असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साथ द्यावी असे आवाहन गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी केले आहे. समस्यांची जाण असणारे सर्वसामान्य कुटुंबातील तरुणच ग्रामीण भागाचा विकास करू शकतात, हे गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांची भूमिका खऱ्या अर्थाने कोकणातील गाव खेड्यातील सामान्य माणसाला न्याय देणारी आहे. निवडणुकांमध्ये पैशांचे वाटप करणारे दलाल तुमच्या आमच्या गावांचा विकास कधीच करणार नाहीत अशी ठाम भूमिका गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी मांडली आहे. पैशांच्या जोरावर राजकारण करणारे गावांच्या विकासाला खीळ घालत असून स्वतःचा विकास करण्यात असे लोक मग्न असल्याचे मत उदय गोताड यांनी मांडले आहे.