योग्य वेळी वृक्ष लागवड करण्याची मागणी
केबल टाकताना मार्गाची दुर्दशा
बांधकाम विभागाची भूमिका संताप जनक
देवरुख:- संगमेश्वर-कोल्हापूर राज्य मार्गावर त संगमेश्वर ते देवरुख दरम्यान वाढत्या तापमानाची तमा न बाळगता रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याच्या कामाला वेग आला आहे. भर ऊन असल्याने रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे करपून जाऊ लागली आहेत. रखरखत्या उन्हामध्ये वृक्ष लागवड करण्याचा हेतू काय? असा सवाल आता ग्रामस्थ करीत असून योग्य वेळी वृक्ष लागवड करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
संगमेश्वर ते देवरुख रस्त्यावर झाडे लावण्याचे काम सुरू आहे. संगमेश्वर ते कोसुंब दरम्यान झाडे लावून झाली असली तरी बुरंबीच्या पुढे या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही झाडे लावताना योग्य हंगाम, योग्य वेळ याचा विचार केलेला नाही. रस्त्याच्या दुतर्फा खड्डे मारून त्यामध्ये झाडे लावली जात असून काही झाडे रखरखत्या उन्हाने लावण्यापूर्वीच करपून गेली आहेत.
कडक, रणरणत्या उन्हात व चुकीच्या हंगामात झाडे लावून यामधून प्रशासन काय साध्य करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे ही जगली पाहिजेत, यासाठी पाणी दिले जात असले तरी एवढ्या उष्ण वातावरणात ही झाडे टिकाव धरतील असे दिसत नाही. झाडासभोवार पाणी साठवणूक होईल, याची व्यवस्था नाही. दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडासभोवार मोठ्या प्रमाणात गवत असल्याने वणव्यामुळेही झाडाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या बाबीकडे आमदार शेखर निकम यांनी लक्ष घालावे व चुकीच्या पद्धतीने अयोग्य हंगामात करण्यात येत असलेली झाडांची लागवड थांबवावी, अशी मागणी जनतेमधून करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने देवरुख पासून संगमेश्वर पर्यंत ऐन उन्हाळ्यात झाडे लावण्यासाठी जागोजागी खड्डे काढले. प्रत्यक्षात झाडे लावताना मात्र ती बुरंबीपर्यंतच लावली गेली. बुरंबी पासून संगमेश्वर पर्यंत मारलेले दोन फूट खोलीचे खड्डे आजही तसेच असून. यामध्ये झाडे न लावल्याने रस्त्याच्या बाजूने पादचाऱ्यांना चालणे देखील कठीण झाले आहे. या खड्ड्यामध्ये जर झाडे लावायची नव्हती, तर खड्डे मारलेच कशाला ? असा सवाल पादचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. बुरंबी पासून संगमेश्वर पर्यंत मारलेल्या खड्ड्यात जर झाडे लावायची नसतील, तर सदर खड्डे तातडीने बुजून टाकावेत अशी मागणी पादचाऱ्यांनी केली आहे.
केबल टाकताना मार्गाची दुर्दशा
संगमेश्वर देवरुख मार्गावर एका खाजगी कंपनीने रस्त्याच्या बाजूने केबल टाकताना संपूर्ण साईड पट्टीची दुर्दशा करून टाकली असून अनेक ठिकाणी गाईड स्टोन उखडून टाकले आहेत. रस्ता आणि साईड पट्टी यामध्ये उंची निर्माण झाल्यामुळे अपघाताच घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात सदर साईड पट्टी खाचण्याचा धोका असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रोलर फिरवण्याच्या वावड्या
संगमेश्वर देवरुख मार्गावर खाजगी कंपनीने केबल टाकल्यानंतर प्रत्येक पाच किलोमीटरचा भाग रोलर फिरवून समपातळीत करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग देवरूखचे शाखा अभियंता बुर्षें यांनी दिली होती. मात्र अद्याप रुल फिरवणे सोडाच केबल टाकताना उघडलेले गाईड स्टोनही बसवण्यात आलेले नाहीत. याबाबत वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग देवरूखच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.