सहायक आयुक्त दीपक घाटेंची माहिती
रत्नागिरी:- मुख्यमंत्री वयोश्री योजनेतंर्गत जिल्ह्यातील 6 हजार 991 लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 3 हजार रुपये वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.
श्री. घाटे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, वर्षे वय 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” लागू करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत एकुण २१ हजार ८२ इतके पात्र अर्ज प्राप्त झाले आहेत. शासनाकडून ६ हजार ९९१ लाभार्थ्याच्या बँक खात्यात तीन हजार रुपये रक्कम वर्ग करण्यात आली आहे व ऊर्वरित १४ हजार ९१ लाभार्थ्याच्या बँक खात्यात तीन हजार रुपये करण्याची कार्यवाही शासनस्तरावर चालू आहे.लाभ दिलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीव्दारे रक्कम जमा झाल्यानंतर आधार लिंक असणाऱ्या मोबाईल क्रमांकांवर सदर अर्जदारास बँकेमार्फत एसएमएसव्दारे संदेश प्राप्त होतो. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही म्हटले आहे.