खेड:- येथील तालुका क्रीडा संकुल मधील वापरलेल्या विजेचे देयक अदा न केल्याने महावितरणने फ्यूज काढून वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे क्रीडा संकुल अंधारात गेले आहे.
या प्रकाराला क्रीडा संकुल मधील विजेचा वापर करणाऱ्यांचा उदंडपणा व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून, याकडे जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. क्रीडा विभागाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या क्रीडा संकुलाची दुरवस्था होत असल्याने क्रीडा प्रेमींमध्ये नाराजी आहे.
खेडच्या क्रीडा संकुलाचा कारभार अनागोंदी सुरू आहे. या क्रीडा संकुलात एक व्यायामशाळा व एक बॅडमिंटन कोर्ट हॉल सध्या वापरात आहे. परंतु जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे संकुलात अनागोंदी कारभार सुरू आहे. गेल्या काही महिन्यात एका संस्थेने या संकुलाच्या परिसरात महोत्सव भरवून स्टॉल लाऊन भाडे गोळा केले. या महोत्सवात देणग्या देखील गोळा करण्यात आल्या. महोत्सवात क्रीडा संकुलातील विजेचा वापर करण्यात आला. परिणामी रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या या महोत्सवात विजेचा वारेमाप वापर झाला. त्यामुळे क्रीडा संकुलाचे वीज बिल नियमित बिला पेक्षा जास्त आले. परंतु, संबंधित संस्थेकडून ते भरलेच गेले नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने वीज बिल थकीत राहिल्याने २७ रोजी क्रीडा संकुलाच्या वीज जोडण्याचे फ्यूज काढून नेले व वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे संकुलात सायंकाळी खेळण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी आलेल्या खेळाडूना परत जावे लागले.
व्यायामशाळा चालवणाऱ्या व्यक्तीने देखील वीज पुरवठा पूर्ववत करण्याबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत क्रीडा प्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष आमदार योगेश कदम यांच्याकडे गृह राज्य मंत्री पदाची जबादारी असल्याने त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे याकडे त्यांना लक्ष देता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.