खेड:- शहरातील डाकबंगला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे स्टोअर रूम फोडून अज्ञात चोरट्याने ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल होताच चोरट्याच्या शोधार्थ श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनीही पोलीस पथकासमवेत घटनास्थळाची पाहणी केली.
येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृह इमारत उभारणीचे काम सुरू आहे. या इमारत उभारणीच्या कामामुळे जुन्या विश्रामगृहाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली होती. या विश्रामगृहातील ३ हजार रु. किं.चे पाच सिलींग फॅन १हजार रु. किं.ची स्टीलची भांडी १,२०० रु. किं.ची ॲल्युमिनिअमची भांडी त्यामध्ये सहा अॅल्युमिनिअमची पातेली, २४ बेडशीट, ४० रु. किं. च्या दोन सोलापूर चादर असे ६८ हजाराचे साहित्य चोरून नेण्यात आले.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास स्टोअर रूम फोडल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच ही बाब येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर रितसर येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चोरीचा छडा लावण्यासाठी श्वानपथकास पाचारण करण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार सायंकाळी उशिरा श्वानपथकही घटनास्थळी दाखल झाले. स्टोरुम फोडणारा स्थानिक असण्याच्या शक्यतेने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. चोरीचा उलगडा करण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सूचना केल्या आहेत. लवकरच चोरट्याच्या मुसक्या आवळू असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे.