संगमेश्वर:- तालुक्यातील आंबव पोंक्षे गावची कु अमिषा संदीप नेटके हिला व.पु.काळे पुस्तक कव्हर पुनर्रचना प्रकल्पासाठी यावर्षीचा सर्वोत्तम प्रकल्पासाठी गौरवण्यात आले आहे.ती मुंबई वडाळा येथे जे.के.कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन येथे शिक्षण घेत आहे.
हा प्रकल्प प्रसिद्ध मराठी साहित्यिक व. पु. काळे यांच्या पुस्तकांच्या कव्हर पुनर्रचनेवर आधारित होता.व.पु.काळे यांची कथा शैली सहज, विनोदी आणि भावनिक गुंतवणुकीने भरलेली आहे. त्यांच्या साहित्याच्या मूळ आत्म्याला सन्मान देत, या पुनर्रचनेचा उद्देश त्यांच्या कथांचा गाभा समर्पकपणे मांडत आधुनिक सौंदर्यदृष्टिकोनातून सादर करणे हा होता.
या कव्हर डिझाईन्समध्ये रंगसंगती, टायपोग्राफी आणि दृश्य प्रभाव यांचा सुरेख समावेश करून पारंपरिक मूल्यांना आधुनिक अभिव्यक्ती देण्यात आली होती.या नव्या रूपात, व. पु. काळे यांच्या साहित्याचा वारसा जतन करणे आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे हे मुख्य उद्दिष्ट होते.
हे उद्दिष्ट आमिषाने लीलया पूर्ण केले.तिच्या या यशाबद्दल,गावातून परिसरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.अमिषा ही माखजन इंग्लिश स्कूल ची माजी विद्यार्थिनी आहे.