मालवण : शिवपुतळा उभारण्याच्या कामासाठी आवश्यक असलेले भाग येण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या दगडावर उभे दाखविण्यात येणार आहेत. त्या खडकाचा भाग बसवण्याच्या कामास सोमवारपासून सुरुवात होणार आहे.
यात उर्वरित पुतळ्याचे भागही येथे येण्यास सुरुवात झाली असून, प्रत्येक आठवड्यात हे भाग येथे दाखल होतील. आतापर्यंत पुतळ्याचे गळ्यापर्यंतच्या भागाचे काम पूर्ण झाले आहे. जसजसे भाग येतील त्यानुसार वेल्डिंगचे काम हाती घेतले जाणार आहे. एप्रिल महिन्यापर्यंत पुतळा उभारण्याचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी दिली.
मालवण राजकोट येथील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविण्याचे काम श्री राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला राज्य शासनाने दिल्यानंतर रविवारी व्हाईस प्रेसिडेंट अनिल राम सुतार यांनी मालवण येथे भेट देऊन पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी अभियंता अभिषेक लोहार उपस्थित होते. अनिल सुतार म्हणाले, आतापर्यंत आलेले पुतळ्याचे भाग किल्ल्यावर आणताना समस्येला सामोरे जावे लागले. याचा विचार करून या पुढील भाग छोट्या आकाराचे बनवण्यात येणार आहेत. पुतळ्याचा चबुतरा पूर्ण झाला असून पिलर जमिनीपासून वीस फूट उंच आहेत. यावर पूर्ण स्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे. सुमारे दीडशेहून अधिक कामगार या ठिकाणी काम करत आहेत.
काम दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न
शिवपुतळा उभारण्यासाठी 21 कोटी रुपयांची निविदा मंजूर आहे. आयआयटीकडून पिलर दर्जेदार उभारण्याच्या सूचना आल्याने प्रत्यक्षात जास्त पैसा खर्च झाले आहेत.
स्थानिकांचे चांगले सहकार्य
या कामासाठी स्थानिकांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. पुतळ्याचे भाग राजकोटपर्यंत आणण्यासाठी स्थानिकांनी खूप सहकार्य केले.