देवरुख:- श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने ग्रंथ व श्री सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सुबोध जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेंद्र व सौ. श्रावणी शिंदे या दाम्पत्यांने ग्रंथ व सत्यनारायणाची विधिवत पूजा केली. दुपारच्या सत्रात ज्योती महिला मंडळ, देवरुख यांनी सुश्राव्य भजन सादर केले. यामध्ये सविता गद्रे, नेत्रा दांडेकर, वासंती राजवाडे, श्रद्धा राजवाडे, मेधा जोशी, चित्रा साने, सुप्रिया जोशी, मंजिरी दांडेकर, मीनल देसाई, मानसी साठ्ये व जयश्री जोशी यांनी सहभाग घेतला. भजनासाठी हार्मोनियम साथ शमा साठ्ये, तर तबला साथ सोहम राजवाडे यांनी दिली.
सायंकाळच्या सत्रामध्ये मराठी भाषा दिनानिमित्त मदन मोडक यांच्या ‘प्रयागराज महाकुंभ अनुभव कथनाचा’ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन आणि ज्ञानपीठ विजेते वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमा पूजनाने मान्यवरांनी केला. यानंतर प्रमुख वक्ते मदन मोडक यांचा ‘सामाजिक कार्य व प्रयागराज कुंभमेळ्यातील सहभागाबाबत’, ज्येष्ठ कार्यकारणी सदस्या शालिनी जोशी यांना वाचनालयाच्या कार्यातील विशेष योगदानासाठी, अनघा लिमये यांना ‘उत्कृष्ट वाचक’ सन्मानासाठी, प्रा. अरविंद कुलकर्णी यांना विद्यावाचस्पती पदवीसाठी, तर प्रा. जी. के. जोशी यांना जिल्हा ग्रंथालयाने सन्मानित केलेल्या ‘ग्रंथालय कार्यकर्ता’सन्मानासाठी मान्यवरांनी गौरविले. याप्रसंगी वाचनालयाच्या जेष्ठ कार्यकारी मंडळ सदस्या डॉ. वर्षा फाटक यांनी लिहिलेला व नुकताच प्रकाशित झालेला ‘पाश’ हा कथासंग्रह वाचनालयाला भेट म्हणून दिला.
मदन मोडक यांनी आपल्या अनुभव कथनाची सुरुवात “पार्वती पते हर हर महादेव…” या गर्जनेने करून अध्यात्मिक वातावरणाची निर्मिती केली. वाराणसी येथे पोहोचताच विमानातून सूर्याचे झालेले दर्शन “चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन” या उक्तीप्रमाणे कशाप्रकारे झाले, हा सुखावणारा अनुभव कथन केला. वाराणसी शहराला असणारी विविध नावे, वाराणसी हे नाव वर्ण व असी या दोन पवित्र नद्यांमुळे प्राप्त झाल्याचा पौराणिक इतिहास विशद केला. प्रयागराज येथील विविध घाट तेथील दर्शनाची उत्कृष्ट व्यवस्था, स्वच्छता आणि धार्मिक महत्त्व याचाही आढावा घेतला. प्रयागराजमधील जे विविध घाट आहेत. यामधील तुलसी, दरभंगा, दशअश्वमेघ, हरिश्चंद्र, चेत तसेच विश्वेश्वर मंदिर आणि रामनगर किल्ला यांचे बांधकाम मराठी राजानी व शासकांनी बांधल्याच्या आठवणींचा सविस्तर आढावा घेतला. वाराणसी येथील नमो घाटाबाबत भव्यता विशद करताना, मोडक यांनी तेथील स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शुद्ध पाण्याची सोय, अध्यात्मिक वातावरण, घाट व देवळांची रचना, पुरातन वास्तूंचे केलेले जतन व नव्याने बांधलेल्या आधुनिक वास्तू व देवालये, रस्ते व इतर दळणवळण व्यवस्था, अप्रतिम प्रकाश योजना, गंगेतील स्वच्छता व दर्शनासाठी उपलब्ध करून दिलेले भव्य दिव्य क्रूज याबाबत आढावा घेतला.
काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतानाचा हृदयस्पर्शी अनुभव रसिक श्रोत्यांना अधिक भावला. गंगेतल्या स्नानाचा अर्थात डूबकीचा श्री. मोडक यांनी सांगितलेला पवित्र अनुभव अध्यात्माची उंची गाठणार होता. रेल्वेमधून प्रयागराजचे झालेले दर्शन एक वेगळाच अनुभव रसिकांना देऊन गेला. वनवासी कल्याण आश्रमाच्या शिबिरामधील आलेला उत्तम अनुभव व नीटनेटकेपणा याबाबतचे वर्णन प्रेक्षकांना सुखावणारे होते. उत्तर प्रदेश सरकारने कुंभमेळ्यासाठी केलेले उत्तम नियोजन व व्यवस्था याबाबतचा सविस्तर आढावा मोडक यांनी घेताना स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा, शेतकरी, स्वच्छता दूत आणि विविध मदतनीस यांच्या उत्तम कार्याची प्रशंसा केली.
प्रयागराज कुंभमेळ्यात गरिबीची कोणतीही लाचारी नव्हती, तर श्रीमंतीची मुजोरी देखील नव्हती. कुंभमेळ्यात भक्तांमध्ये कोणताही भेदभाव दिसला नसल्याचे कथन करताना, त्या ठिकाणी दोनच पंथ दिसले ते म्हणजे एक गंगा मातेच्या अनामिक ओढीने दर्शनाला जाणारा भाविकांचा जथ्या, तर दुसरा म्हणजे गंगा स्नान करून आनंदाने व समाधानाने कपाळी त्रिपुर लावून परतणारा भक्तांचा मेळा. प्रयागराज कुंभमेळा आणि पंढरपूर… तुकाराम महाराज… चंद्रभागा यांच्यामधील साम्य श्री. मोडक यांनी वेगळ्या अध्यात्म दृष्टिकोनातून स्पष्ट करून तुकाराम महाराजांच्या “खेळ मांडीयेला वाळवंटी घाई….” या अभंगांनी सांगता करून सर्वांना दिव्यत्वाची अनुभूती देऊन कथनाची सांगता केली. मराठी भाषा दिनाच्यानिमित्ताने नव्याने सभासद झालेल्या आंबव इंजिनिअरिंग कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अनिरुद्ध जोशी (एम. टेक., पी.एचडी.) व सौ. युगश्री जोशी(एम. टेक.) यांना ग्रंथ भेट देऊन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी यांनी सन्मानित केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गांने मेहनत घेतली.