५५ गटांचा सहभाग : विदेशी पर्यटकांची भेट, शहरात बचतगटांना कायमस्वरूपी गाळे
रत्नागिरी : राज्य शासनाच्या महिला बालकल्याण विभाग अंतर्गत रत्नागिरी महिला आर्थिक विकास महामंडळाला (माविम) ५० वर्ष पूर्ण होत असल्याने महिला दिनाचे औचित्य साधून लोकसंचालित साधन केंद्रच्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन तालुक्यातील गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव, महिला व बाल विकास विभागाचे महिला व बालकल्याण अधिकारी श्रीकांत हावळे तसेच जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या पत्नी श्रीमती पूजा गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात खेड, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वरमधील ५५ महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला असून, महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला, परराज्यातील तसेच विदेशी पर्यटकांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव श्री. सातव यांनी दिली. महिला दिनानिमित्त राज्य शासनाच्या माध्यमातून राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून महिलांना आर्थिक उन्नत करण्याबरोबरच त्यांचा समाजातील स्तर उंचावणारा असल्याचे मत व्यक्त केले. महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ करत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी नुसते संसारिक भाग न सांभाळता कायदेविषयक जाणीव करून त्यांना कायदेविषयक माहिती ही यावेळी सातव यांनी दिली. तसेच आजची महिला काय करू शकते हे देखील त्यांनी विविध उदाहरणांच्या मार्गदर्शनातून महिलांना सांगितले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. हावळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने राबवले जात आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनीही महिला सक्षमीकरणासाठी ‘माविम’ला उत्तम सहकार्य करत प्रयत्न सुरू केले आहेत. २ कोटी रुपये खर्चून ‘माविम’च्या बचत गटांना त्यांनी कायमस्वरूपी विक्री केंद्र उपलब्ध करून दिले आहेत त्याबद्दल त्यांचे आभार. महाराष्ट्र राज्य शासनाने यशस्विनी पोर्टलची देखील निर्मिती केली असून महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनांची नोंदणी करावी. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या तीन टक्के निधीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बचत गट विक्री केंद्र स्थापित झालेली असून सर्व महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनांची विक्री या केंद्रांमध्ये करावी, असे आवाहन श्री. हावळे यांनी केले.
श्रीमती गोसावी यांनी ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवत असलेल्या या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. ‘माविम’चे जिल्हा समन्वयक अधिकारी अंबरेश मेस्त्री यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी उपजीविका विकास सल्लागार विनय चव्हाण, लेखाधिकारी प्रवीण पाटील, एमआयएस सल्लागार रागिनी देसाई, रसिका गोताळ यांच्यासह सर्व कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले आहेत.
इटली, फ्रान्स येथील पर्यटकांची स्टॉल्सना भेट
गणपतीपुळे येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनाला इटली तसेच फ्रान्स इथून आलेल्या काही पर्यटकांनी भेट दिली. सर्व स्टॉलची पाहणी करताना त्यांनी येथून काही वस्तूंची खरेदी ही केली. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्रीकरिता बचत गट प्रदर्शन हे एक उत्तम व्यासपीठ असून गणपतीपुळे येथे देशी व विदेशी पर्यटक हे या संधीचा लाभ घेत आहेत.
बचतगटांना शहरात कायमस्वरूपी गाळे
महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीचा तीन टक्के निधी खर्चून रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे माविमला बचत गट वस्तू विक्री केंद्रासाठी ११ गाळे उपलब्ध करून दिले आहेत.