रत्नागिरी:श्रीदेव भैरी देवस्थानचा शिमगोत्सव येत्या १३ मार्चपासून सुरू होणार असून त्याची रूपरेषा वार्षिक सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आली.
सभेमध्ये शिक्षणमहर्षी कै.एन. व्ही. तथा अरुअप्पा जोशी गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ झाला. यामध्ये उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (वाणिज्य विभाग) (१२ वी) मार्च २०२४ मध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची पी. जी. अभ्यंकर ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी तृषा संदीप चितळे (९७.%) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) मार्च २०२४ रत्नागिरी पालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये ९९.४० टक्के गुण मिळवून फाटक हायस्कूलची विद्यार्थिनी सई राजेश अवसरे प्रथम आल्याबद्दल या दोन्ही विद्यार्थिनींचे स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व प्रत्येकी रोख पाच हजार रुपये देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्रीदेव भैरी देवस्थानच्या शिमगोत्सवाची रूपरेषा ठरविण्यात सभेस बारा वाड्यांतील सर्व मानकरी, गावकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे यांनी सभेस उपस्थित सर्व मंडळीचे आभार मानून गाऱ्हाणे घातले.