चिपळूणच्या ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटर येथील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
चिपळूण (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या एका ६४ वर्षीय व्यक्तीला तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाले. हा रुग्ण मणक्याचा त्रास असल्याने तो गेल्या काही काळापासून पाठीवर झोपू शकत नव्हता आणि त्याचे शरीर पुढच्या बाजून झुकलेले होते. अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेचे आव्हान यशस्वीरित्या पेलत चिपळूणच्या ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटर येथील सर्जिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ एहसान शेख यांनी रुग्णावर यशस्वी उपचार केले.
तिसऱ्या टप्प्यातील तोंडाच्या कॅन्सरवर जोखमीची शस्त्रक्रिया करुन या रुग्णाला नवे आयुष्य मिळवून दिले. तंबाखुचे सेवन करणाऱ्या तसेच सिगारेटचे व्यसन असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीला तोंडाच्या आतील भागात अल्सरची समस्या सतावत होती. त्यावर उपचाराकरिता त्याने रुग्णालयाला भेट दिली. या रुग्णाची पुढील तपासणी केली असता त्याला तिसऱ्या टप्प्यातील स्क्वॅमस सेल कार्सिनोमाचे निदान झाले. हा तोंडाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि तो सामान्यतः तोंडाच्या, ओठांच्या आणि जीभेच्या आतील बाजूस असलेल्या स्क्वॅमस पेशींमध्ये आढळून येतो. बायोप्सी आणि सिटी स्कॅन तपासणीद्वारे या रुग्णाला कर्करोगाचे निदान झाले. सिटी स्कॅन तापसणीमध्ये हा कर्करोग हाडांमध्ये पसरु लागला होता त्यामुळे त्वरीत उपचारांची आवश्यकता होती. मात्र काही वर्षांपुर्वी किरकोळ अपघातात पडल्याने या रुग्णाच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या पाठीच्या मणक्याला बाक आले होते. त्यामुळे त्याचे शरीर पुढील बाजूने झुकले होते. मणक्याला दुखापत झाल्याने रुग्ण पाठीवर झोपु शकत नव्हता व अशा अवस्थेत या रुग्णावर कर्करोगाची शस्त्रक्रिया करणे अतिशय आव्हानात्मक होते. शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यापुर्वी ऑर्थोपेडिक तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. या शस्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या ट्युबमुळे रुग्णाला भविष्यात कायमचे अंथरुणाला खिळून रहावे लागू शकते असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पहिल्यांदा शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली. मात्र त्यानंतर हा कर्करोग वेगाने पसरु लागल्याने काही दिवसांनी रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट व मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनासह ही जोखीम पेलत या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही जोखमीची शस्त्रक्रिया करण्यापुर्वी रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात आले व त्यांच्या संमतीने शस्त्रक्रियेची योजना आखण्यात आली. रुग्ण पाठीवर झोपु शकत नसल्याने त्याला ४५ अंशाच्या स्थितीत बसवून तसेच योग्य स्थिती नेक एक्स्टेंशन तसेच मिळविण्यासाठी उश्यांचा वापर करण्यात आला. अशा पध्दतीने जवळपास पाच तास सुरु असलेली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली डॉ एहसान शेख यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या हाताळत रुग्णाला कर्करोगातून मुक्त केले. भुलतज्ञ डॉ अविनाश पवार यांनी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला भूल दिली तसेच शस्त्रक्रियेनंतर डॉ अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाला रेडिएशन थेरपी देण्यात आली. रुग्णासा आता घरी सोडण्यात आले असून तो आता सर्वसामान्य आयुष्य जगत आहे.रुग्णाचे रुग्णाच्या कुटुंबियांनी लाईफ केअर हॉस्पिटल आणि तेथील डॉक्टरांच्या टिमचे विशेष आभार मानले.