रत्नागिरी:-येथील हर्षा ऑटोजने आयोजित केलेल्या कार्यशाळेत हाय सिक्युरिटी नंबर प्लेटविषयी रत्नागिरीत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार बाळ माने, रत्नागिरीचे सहाय्य्क प्रादेशिक परिवाहन अधिकारी अजित ताम्हणकर, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत जाधव, सहायक मोटार वाहन निरीक्षक सुशांत पाटील उपस्थित होते.रत्नागिरी जिल्ह्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वितरणाची जबाबदारी हर्षा ऑटोजकडे देण्यात आहे. जास्तीत जास्त वाहनधारकांपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लवकरात लवकर पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात केंद्र उभारण्यात येईल, असे यावेळी हर्षा ऑटोजचे मिलिंद सावंत यांनी सांगितले. यावेळी मोटर वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नंबर प्लेट का महत्त्वाची आहे, हे उदाहरणे देऊन समजावले. तसेच १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या प्रत्येक वाहनधारकाने वेळेत ही नंबर प्लेट लावावी, असे आवाहन करण्यात आले. माजी आमदार बाळासाहेब माने यांनीदेखील याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमागील नितीन गडकरी यांची संकल्पना सांगितली. रस्त्यांवरील सुरक्षिततेकडे मोटर वाहन विभागाने लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. अंबर हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी १० जणांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे वितरण करण्यात आले. पेट्रोल डीलर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय लोध यांनी संगमेश्वरमधील धामणी पेट्रोल पंपावर लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रत्नागिरी शहरातील नागरिक या समारंभाला उपस्थित होते.