खेड ः केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील गुणदे येथील घरकुलासाठी पात्र ठरलेले लाभार्थी पहिल्या हप्त्यापासून वंचित होते.
अखेर २०२४-२५ या आर्थिक वर्षातील प्रतीक्षा यादीतील घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. योजनेंतर्गतच्या सर्व लाभार्थ्यांना घराचे मंजुरीपत्र रवींद्र आंब्रे, सोनाली आंब्रे, शिक्षणविस्तार अधिकारी श्रीधर शिगवण यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. शिगवण यांनी घरकुलाची रचना व काम ९० दिवसात काम पूर्ण करण्याचे आवाहन केले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे यांनी घरकुल काम सुरू करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.