बुलडाणा : नाणीज येथे देवदर्शनासाठी निघालेल्या अभियंत्याचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे. देवदर्शनासाठी पोचण्याआधीच मृत्यूने गाठले.
सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु, येथील रहिवासी आणि पुण्यात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या कैलास ताराचंद चव्हाण (वय ३०) यांचा सातारा जिल्ह्यातील शिराळा येथे कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, कैलास चव्हाण हे पत्नी कांचन चव्हाण (वय २३), सासरे भीमराव पवार (वय ५०), सासू वर्षा पवार (वय ४५) आणि कारचालक पवन संतोष राठोड (रा. आळंदी, मूळ गाव पिंपरखेड, ता. सिंदखेडराजा) यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील नानीज येथे देवदर्शनासाठी निघाले होते.
शिराळा बायपासवरील गोरक्षनाथ मंदिर पुलाजवळ दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कैलास चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चारजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.