राजू शेट्टींनी सरकारला दिला इशारा
कोल्हापूर: रत्नागिरी – नागपूर महामार्ग भुसंपादनास विरोध करणा-या शेतक-यांना हातकंणगले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात शेतकऱ्याची भेट घेत सरकारला इशारा दिला.
राज्य सरकारने बळाचा वापर केल्यास जशास तसे उत्तर देवू. तसेच ६ तारखेच्या दौ-यावेळी मुख्यमंत्र्यांना स्वाभिमानी स्टाईलने जाब विचारणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
रत्नागिरी – नागपूर महामार्गासाठी भुसंपादन केले जात आहे. चौपट मोबदला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे एक वर्षापासून प्रलंबित आहे. मोबदला दिल्याशिवाय शेतकरी मोजणी करू न देण्यावर ठाम आहेत. तरी शेतक-यांना कोणत्याही नोटीसा न देता हुकुमशाही पध्दतीने भुसंपादन सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी व राज्य सरकार विरोधात हा संघर्ष सुरू असून पोलिस बळाचा वापर करून बळजबरीने रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आज, शुक्रवारी हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली.
यानंतर राजू शेट्टी यांनी थेट पोलिस ठाणे गाठत शेतक-यांची भेट घेतली. दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी फोनवर चर्चा केली. शेतक-यांच्या विरोधात बळजबरीचा वापर केल्यास सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत बंद करणार असल्याचा इशाराही दिला. राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतक-यांचा निर्णय घेण्यास यांना वेळ नसल्याचा आरोपही यावेळी केला.