रायगड: रायगड जिल्ह्यातील अलिबाग याठिकाणी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अलिबाग येथील समुद्रात एका मच्छिमार बोटीत आगीचा भडका उडाला आहे. जेव्हा आग लागली तेव्हा बोटीत १८ ते २० खलासी होते.
शुक्रवारी सकाळी ही बोट अलिबाग इथं खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेली होती. यावेळी अचानक बोटीला आग लागल्याची माहिती मिळत आहे.
खोल समुद्रात बोटीला लागलेल्या आगीचे काही व्हिडीओज आणि फोटोज आता समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत भर समुद्रात एका बोटीला भीषण आग लागल्याचं दिसून येत आहे. आगीची ही घटना घडल्यानंतर आसपासच्या मच्छिमार करणाऱ्या बोटी घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिकांच्या मदतीने ही बोट समुद्र किनाऱ्यावर आणली आहे. अजूनही बोटीला लागलेली आग विझवण्याचं काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची आहे. अचानक आग लागल्यामुळे बोटीचं प्रचंड नुकसान झालं आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली आहे. बोटीवरील जाळी देखील जळाली आहे. अपघाताच्या वेळी बोटीत 18 ते 20 खलाशी होते, मात्र सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या आगीत १ कोटी ८० लाखांचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.