सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कांबळी यांच्या उपोषणाला यश
चिपळूण : गेल्या काही महिन्यांपासून येथील मध्यवर्ती बसस्थानक तसेच शहरातील भोगाळे परिसरात हातगाडी आणि खोकेरधारकांचे अतिक्रमण वाढले होते. या अतिक्रमणाविरोधात अनधिकृत टपऱ्या तसेच विक्रेत्यांना हटवावे, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी चिपळुणातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कांबळी यांनी चिपळूण नगर पालिकेसमोर आमरण उपोषण छेडले होते. या उपोषणस्थळी पालिका अधिकाऱ्यांसोबत दाखल झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने श्री. कांबळी यांनी आपले उपोषण दुपारी स्थगित केले होते. नगर पालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास पुन्हा उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
आता या अतिक्रमण विरोधात पालिकेने गुरुवारी हातोडा उगारत मोठी कारवाई केली. तब्बल ७८ खोके व हातगाडी धारकांवर कारवाई करण्यात आली. यातील काहींचे साहित्य जप्त केले. चिंचनाका ते पॉवर हाऊस दरम्यान अतिक्रमण केलेल्या जागेत खोदाई करून बंदोबस्त केला आहे. यापुढे याभागात पुन्हा अतिक्रमण झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
येथील पालिकेने दोन महिन्यांपूर्वी बाजारपेठसह उपनगर भागात तसेच चिंचनाका ते पॉवरहाऊस दरम्यान
अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. मात्र त्यानंतर ही कारवाई थंडावताच पुन्हा त्याचठिकाणी मोठ्या संख्येने अतिक्रमण झाले होते. रस्त्यालगत खोके उभारून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी ठेवल्याने पादचाऱ्यासह वाहतूकदारांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याविषयी गेल्या काही दिवसांपासून ओरड सुरू होती. याशिवाय मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे मुख्य गटर बुजले होते. या भागातील सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. गटारे तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. अखेर पालिकेने हे खोके व हातगाडीधारकांना साहित्य हटविण्यासाठी मुदत दिली होती. मात्र तरीही संबंधितांनी खोकी न हटवल्याने गुरुवारी पालिकेने अतिक्रमण हटाव मोहिम जोरदारपणे राबवली. मात्र पालिकेने अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे व्यावसायिकांची पळापळ झाली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, वैभव निवाते, रोहिणी खाडे, संदेश टोपरे, बांधकाम अभियंता दीपक निंबाळकर, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजीत जाधव, संतोष शिंदे, राजेंद्र जाधव, वलित वांगडे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने झाले होते.