शेतकरी संजय शिंदे यांचा यशस्वी प्रयोग
देवरुख :- कोकणातील लाल मातीमध्ये मोहरी व कोथिंबीर पिकवून संगमेश्वर तालुक्यातील कोंढ्ण येथील शेतकरी संजय भार्गव शिंदे आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. हे शेतकरी आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करून यशस्वी करत असतात. यामुळेच शिंदे यांना त्यांच्या परिसरातील ग्रामस्थ प्रयोगशील शेतकरी म्हणून संबोधतात.
संजय शिंदे हे वडिलोपार्जित भात शेती सांभाळत असत. उन्हाळ – पावसाळ भात शेती हाच त्यांचा प्रमुख शेती व्यवसाय होता. यानंतर उन्हाळी भात शेती बंद करून जमिनीमध्ये भाजीपाला लागवड शिंदे यांनी सुरू केली. सेंद्रिय खतावरील पालेभाजी स्वतः शिंदे पिकवून प्रत्यक्ष त्याचे विक्री देखील करत असतात. यामध्ये त्यांनी पालेभाजीच्या जोडीला वांगी, मिरची, टोमॅटो व बाजारात जादा किमतीने घ्यावी लागणारी कोथिंबीर याचबरोबर उन्हाळी कुळीथ, पावटा व मोहरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेत असतात.
शिंदे यांच्या शेतात पिकणारी मोहरीचे दाणे मध्यम असून तपकिरी रंगाची पिकविली जाते. याच मोहरीची लहान रोपे याची भाजी देखील चांगल्या प्रकारचे होते. हे ग्रामस्थांना पटवून देण्याचे काम शिंदे यांनी केले आहे. आज शिंदे यांच्या शेतावर मोठ्या प्रमाणात मोहरीची भाजी घेण्यास ग्राहक येत असतात.
मोहरी पालेभाजी व प्रत्यक्ष मोहरीचे पीक श्री शिंदे घेतात. याच जोडीला बटाट्याची लागवड देखील त्यांनी केली आहे. ही लागवड प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी केली आहे. करांदे, कणघर, घोरकंद, भेंडी, हळद दालचिनी, दुधी भोपळा, कारली, पडवळ, घेवडी यांचे उत्पादन घेत असतात. कोकणामध्ये देखील मोहरीचे पीक चांगले घेता येते हे शिंदे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पंजाब मध्ये या भाजीला सरसोदा असे म्हणतात. मोहरीच्या पानांची पंजाब मध्ये स्पेशल भाजीची डिश बनविली जाते.
शिंदे यांनी हीच भाजी कोकणामध्ये देखील ग्रामस्थ आवडीने खातील , याच हेतूने लागवड केली. सध्या ग्राहकही या भाजीची मागणी करतात. सध्या मोहरी बरोबरच कोथिंबीर, मुळा, भेंडी, गवार, लाल व हिरवा माठ यांचे उत्पादन घेत आहेत. दिवसभर शेतात राबवून पिकवलेली भाजी स्वतः दुचाकीने गावोगावी नेऊन विक्री करत असतात.निर्मिती ते विक्री या सर्व बाजू शिंदे सहज पेलवतात. सध्या वानर व माकडांचा मोठा उपद्रव शेतात होत असल्याने. शिंदे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून शेतीवर जाळी उभारण्याचे काम त्यांनी केले आहे.
याचबरोबर खोटे वाघ आणून शेताच्या बांधावर बसवले आहेत. यांने वानर व माकडांचा उपद्रव कमी होईल अशी त्यांची भावना होती. तरीही हा उपद्रव थांबत नसल्याने दिवसभर शेतात कुटुंबातील एका व्यक्तीला डोळ्यात तेल घालून थांबावे लागते ही खंत संजय शिंदे यांनी व्यक्त केले आहे. नारळाच्या पात्यांपासून स्वतः झाडू देखील तयार करून विकण्याचे काम शिंदे करत असतात. कोकणामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या चविष्ट पिकवता येतात हे शिंदे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
शिंदे ग्राहकांना भाजीपाल्याची रोपे देखील देतात याच प्रमाणे तिचे बी देखील पुरविण्याचे काम करतात. शिंदे पिकवीत असलेल्या भाजीपाल्याचे पारंपारिक बी वापरत असतात. सदर बी हे त्यांच्याच शेतातील त्यांनी राखून व ठेवून दिलेले असते. शिंदे कधीही शेती सोडून दिसल्यास त्यांच्याकडे पालेभाज्याची बी अथवा पालेभाजी ही मिळणारच! यामुळे ग्राहकही त्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. सेंद्रिय खतावरील पिकवलेली भाजी ही चविष्ट असल्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस सर्व प्रकारच्या भाज्या उतरत असतात.