खेड:-महावितरणच्या उपविभागांतर्गत थकित वीजग्राहकांना वीजबिले भरणा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र त्याकडे कानाडोळा करणाऱ्या थकबाकीदारांवर महावितरणच्या वसुली पथकांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
उपविभागांतर्गत दिवसाला १५०हून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. या कारवाईमुळे वीजबिले भरणा करण्यास आरंभ झाल्याचे महावितरणकडून देण्यात आली.
मार्च अखेर जवळ आल्यामुळे महावितरणकडून गेल्या आठवडाभरापासून थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. विशेष पथकांमार्फत खेड शहर उपविभागातील भरणे, भोस्ते, दापोली रोड, शिवतररोड आदी भागात दिवसाला ६० थकित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर ग्राहकांनी तातडीने वीजबिले भरणा केली. काही ग्राहकांकडून बिलांबाबत विचारणा करण्यासाठी वसुली पथकातील कर्मचाऱ्यांबरोबर वादही घातले. शहरातील एका ग्राहकाकडे थकित बिलभरणा करण्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीचा प्रकार समोर आला. या प्रकारानंतर महावितरणचे सर्व वीज कर्मचारी एकटवले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी कर्मचारी गेले होते. या दरम्यान, त्या थकित ग्राहकाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांची माफी मागत वीजबिलदेखील तातडीने भरणा केले. यामुळे या प्रकरणावर पडदा पडला.