रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागांतर्गत नारळ वाळवणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे किलो नारळ वाळवणे तसेच नारळाच्या चिप्ससुद्धा करणे सोपे झाले आहे.
नारळाच्या सुरुवातीच्या ६० टक्के आर्द्रतेपासून ६ टक्के आर्द्रतेपर्यंत वाळवणे शक्य होते. यासाठी ऋतुमानानुसार ३० ते ३५ तासांचा कालावधी लागतो.
या वाळवणी यंत्रासाठी नारळाचे सोढणं इंधन म्हणून वापरता येते. त्यामुळे हे वाळवणी यंत्र आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरु लागले आहे.
नारळाचे चिप्स
नारळ फोडून खोबरे करंवटीपासून दूर करून घ्यावा. साल पिलरच्या मदतीने काढून ०.०५ टक्का पोटॅशियम मेटाबाय-सल्फाइट मिश्रित उकळणाऱ्या पाण्यात १५ मिनिटे उकळून घ्यावे. स्लायसरने खोबऱ्याचे चिप्स (काप) करा आणि साखर/मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे.
नारळाचे गोड काप
नारळाचे गोड काप बनविण्यासाठी साखर व पाणी १:१ या प्रमाणात घेऊन साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंत मिश्रण गरम करा व त्या मिश्रणात व्हॅनिला फ्लेवरचे ४ ते ५ थेंब टाकून चिप्स ४५ मिनिटे बुडवून नंतर वाळवणी यंत्रात सुकवण्यासाठी ठेवावेत.
भाजणीसाठी तापमान
काप कुरकरीत होण्यासाठी ६०० ते ६५ अंश सेल्सिअस तापमानात ४ ते ५ तास लागतात. भाजणीकरिता तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत वाढवावे आणि कापांना हलका सोनेरी रंग येईपर्यंत वाळवावे. वाळवणी यंत्रातून काढल्यानंतर थंड होऊ द्यावे.
सुके खोबरे तयार करणे
वाळवणी यंत्र वापरून गरम हवेच्या उष्णतेने नारळ वाळवले जातात. ओल्या खोबऱ्यातील पाण्याचा अंश ५५ टक्के ते ६० टक्के पर्यंत आणावा. वाळवणी यंत्रामध्ये या पूर्ण प्रक्रियेला ३० ते ३३ तास लागतात. सुके खोबरे बनवण्यासाठी तयार नारळ वापरावा.
जैविक इंधनाचा वापर
जैविक इंधनाचा वापर केल्यामुळे इतर इंधनाचा खर्चही कमी होतो. एक किलो ओल्या खोबऱ्यापासून ६०० ग्रॅम सुके खोबरे मिळू शकते. शिवाय खोबऱ्याला धुराचा वास येत नाही.
विद्यापीठाने विकसित केलेले वाळवणी यंत्र फायदेशीर आहे. इंधनाचे ज्वलन, खोबरे वाळवणे दोन गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी होतात. त्यामुळे धुराचा वास येत नाही. – सुरेश शेट्ये, शेतकरी