चिपळूण (प्रतिनिधी):– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषदेने शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले. १२८ जणांनी नोंदणी केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे उर्वरितांना रक्तदान करता आले नाही. तसेच शिवजन्म पोवाडा, छावा महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रमही हाऊसफुल्ल झाला.
सकाळी नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आमदार शेखर निकम यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. काही तास चाललेल्या या शिबिरात ६५ अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान करण्यासाठी १२८ जणांनी नोंदणी केली होती. मात्र ते साठवून ठेवण्याची क्षमता व अन्य काही तांत्रिक बाबींमुळे उर्वरितांना रक्तदान करता आले नाही. डेरवण रूग्णालयाच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले.
जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर कोल्हापूर येथील शिवशाहीर रंगराव पाटील यांचा शिवजन्म पोवाडा सादर झाला. तसेच सायंकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मोकळ्या जागेत स्वरांजली ग्रुप प्रस्तुत छावा महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी आमदार शेखर निकम, उद्योजक प्रशांत यादव, माजी नगरसेवक प्रकाश काणे, मोहन मिरगल, शशिकांत मोदी, लियाकत शहा, मनोज शिंदे, सचिन कदम, बाळा कदम, परिमल भोसले, रिहाना बिजले, रश्मी गोखले, वैशाली शिंदे, उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, मालमत्ता विभागप्रमुख सागर शेडगे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर, अभिलेख व भंडार विभागप्रमुख बलिद वांगडे, सचिन शिंदे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.