रत्नागिरी : युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन 2024-25 मध्ये आज अखेर रत्नागिरी जिल्ह्यातून 2075 निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबा बागाची मँगोनेट या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर होती. परंतु, अपेडा नवी-दिल्ली कार्यालयाकडे विनंती करून ही मुदत दि. 28 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित कालावधित विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
निर्यातक्षम आंबा फळबागेत राबवायच्या योग्य कृषी पद्धती (Good Agriculture Practices) राबविणे आवश्यक आहे. युरोपीय युनियन व अमेरिका देशाला आंबा निर्यात करण्यासाठी क्षेत्रीय/ शेतकरी स्तरावर ठेवायचे दस्तऐवजचे विहित प्रपत्रात जतन करून ठेवावीत. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात (प्रपत्र -१) अर्ज दाखल करावा. (आवश्यक कागदपत्रे- अर्ज, ७/१२, ८ अ आधार कार्ड) त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यामार्फत (कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी) क्षेत्राची तपासणी करून प्रपत्र ४ अ मध्ये अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सादर करावा. त्यानंतर २ ब प्रपत्रात नोंदणी प्रमाण पत्र अदा केले जाते. शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाच्या दृष्टीने शेतात राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या बाबींच्या नोंदी प्रपत्र -क मध्ये वेळेत घेणे आवश्यक आहे. मँगोनेट प्रणालीमुळे स्थानिक बाजारपेठेच्या तुलनेत हापुस आंब्याला निर्यातीमध्ये चांगला दर प्राप्त होईल. बाजारपेठांमध्ये तीव्र स्पर्धा असल्यामुळे निर्यात हा चांगला पर्याय आहे.
सर्व आंबा बागायतदारांना विनंती करण्यात येते, सन 2024-25 मध्ये चालू हंगामाकरिता नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क साधून मँगोनेटद्वारे नोंदणीसाठी त्वरित अर्ज सादर करावेत. प्रथम नोंदणी व नुतनीकरण करणेसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, 7/12, 8अ, बागेचा नकाशा व आधार कार्ड इ. कागदपत्राची आवश्यकता आहे. मॅगोनेटद्वारे नोंदणी करण्याची वाढीव व अंतिम मुदत दि. 28 फेब्रुवारी 2025 अशी आहे. निर्यातक्षम आंबा बागांची वेळेत नोंदणी करण्याकरिता अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांना संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंबा निर्यात करण्यासाठी भौगोलिक मानांकन(GI) चा चांगल्याप्रकारे उपयोग होण्याच्या दृष्टीने मँगोनेट प्रणालीवरती सहभाग नोंदवावा असे आवाहान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.