पाचल:नितिश खानविलकर:- पाचल येथील कै.ज्ञा. म. नारकर वाचनालयाचे माजी कार्यवाह व पाचल हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक कै. एम. बी. साखळकर सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘स्मृतींना उजाळा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेत एम.बी सरांच्या आठवणी, मंदिरे, गावचा इतिहास यांच्यावर आधारित लेख आणि कवितांचा समावेश करण्यात आला आहे. माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनीही ‘माझी शाळा’ हा पाचल भागातील राजकारणातील त्यांच्या अनुभवावर आधारित लेख लिहिलेला आहे. त्यांच्या लेखाचे वाचन कार्यवाह विनायक खानविलकर यांनी केले.
माजी सरपंच अशोक सक्रे, माजी उपसरपंच किशोर नारकर, पाचल हायस्कूलचे माजी शिक्षक सुतार सर, गांधी सर, वत्सला कुलकर्णी, संजय कुलकर्णी, अनेक ग्रामस्थ यांनी एम बी सरांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. अशोक सक्रे यांनी वाचनसंस्कृती टिकण्यासाठी ग्रामपंचायत पाचलकडे जागा मिळवून देण्याची विनंती केली. तर राजेश सावंत यांनी शासन स्तरावर निधी आणि अन्य मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.परिसरातील एम बी सरांचे विद्यार्थी, सहकारी, नातेवाईकही आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद निवृत्त प्रा.डॉ.स्नेहल नेने यांनी भूषवले. सदर कार्यक्रमादरम्यान निवृत्त शिक्षक प्रभाकर पंडित यांच्या ‘आठवणींच्या सहवासात’ या चौथ्या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.
वाचनालयाचे अध्यक्ष किशोर नारकर यांनी वाचनालयाच्या वाटचालीबद्दलचा प्रवास सांगत भावी उद्दिष्टही नमूद केली. वाचनालयाला स्वमालकीची सुसज्ज जागा असावी आणि त्यात स्पर्धा परीक्षा केंद्र, इ लर्निंग, लहान मुलांना खेळातून शिक्षण यांसारख्या सोयी देण्याचा मानस आहे. या कार्यात इच्छूकांनी सढळ हस्ते जागा आणि आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेश सावंत, सरपंच बाबालाल फरास, आत्माराम सुतार, मालूताई उर्फ वत्सला कुलकर्णी, स्नेहल नेने, श्रीकृष्ण सुतार, विंदा साखळकर, प्रभाकर पंडित, विनायक खानविलकर, शिरीष सक्रे, राजन लब्दे, प्रभाकर पाथरे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक खानविलकर यांनी केले.