संगमेश्वर:- महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून जिल्हावार ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आले आहेत. शासकीय विभागीय ग्रंथालय , रत्नागिरी येथे दिनांक २२ व २३ फेब्रुवारी, २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने ग्रंथोत्सवाचे आयोजन केले आहे.
या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शनिवार दि. २२फेब्रुवारी,२०२५ रोजी सकाळी ठीक ११:०० वा. ग्रंथालय संचालक मा. श्री अशोक गाडेकर यांचे शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात उत्तम आणि नियमित वाचक म्हणून श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय देवरुखच्या ज्येष्ठ सदस्या आणि मराठी भाषेच्या अभ्यासक सौ. अनघा अशोक लिमये यांचा ग्रंथालय संचालक मा. श्री अशोक गाडेकर यांचे शुभहस्ते सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखचे विद्यमान अध्यक्ष प्रा. श्री. गजानन केशव जोशी, जे गेली ४२ वर्षे या वाचनालयाच्या व्यवस्थापनामध्ये कार्यरत आहेत आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम वाचनालयात राबवित असतात, त्यांचाही ग्रंथालय कार्यकर्ता म्हणून ग्रंथालय संचालक मा. श्री. अशोक गाडेकर यांचे शुभ हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीही उपस्थित होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. श्रीकृष्णजी जोशी यांनी भूषविले. या ठिकाणी अनेक पुस्तक विक्रेत्यांनी पुस्तक विक्रीचे स्टॉल्स लावले आहेत. मा. श्री. अशोक गाडेकर यांनी वाचकांनी जास्तीत जास्त ग्रंथ खरेदी करावे, असे आवाहन उपस्थितांना केले.