लांजा:-कोकणातील चाकरमान्यांनी आता गावाकडे वळावे, असे आवाहन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी हर्दखळे येथे केले.
सह्याद्रीच्या पायथ्याशी डोंगर रांगात असलेल्या हर्दखळे गावातील प्राथमिक शाळेला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हर्दखळे गावातील स्थानिक व मुंबईतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन शाळेचा अमृत महोत्सव साजरा केला. त्यावेळी श्री. लाड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या महोत्सवासाठी शाळेचे माजी विद्यार्थी व या शाळेत शिक्षक म्हणून काम करून गेलेले सर्व शिक्षक एकत्रित आले होते. त्यात अनेकजण वयोवृद्धही होते. सध्या कार्यरत असलेले या शाळेचे मुख्याध्यापक बंडबे व इतर सर्व शिक्षकांनी तसेच शाळेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रम समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाचे रेखीव नियोजन केले होते. शाळेच्या पटांगणात असलेल्या खुल्या व्यासपीठावर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. लाड, लांज्याचे गटविकास अधिकारी संतोष मेहत्रे, गटशिक्षण अधिकारी श्री सावंग उपस्थित होते. हर्दखळे गावचे सरपंच गणेश इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष राम शेलार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
चाळीस वर्षांपूर्वी याच गावच्या डोलारखिंडीतून पायी चालत शिपोशी गावात असलेल्या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी गेलो असल्याची आठवण ताजी करताना सुभाष लाड यांनी सांगितले की, त्यावेळी गाव मुला-माणसांनी भरलेला होता. शेतीच्या कामासाठी माणसे डोंगरदऱ्यात भटकत ,वावरत होती. इथल्या प्राथमिक शाळेतील शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी इथली मुले शहरात गेली, ती पुन्हा माघारी फिरली नाहीत. त्यामुळे हळूहळू गावातली घरे बंद पडू लागली. आज पर्यटनस्थळ होईल असे नैसर्गिक वरदान मिळालेल्या हर्दखळे गावात रोजगाराची संधी आहे. त्यासाठी चाकरमान्यांनी पुन्हा गावाकडे वळावे.
यानिमित्ताने हर्दखळे गावाचा इतिहास, इथले लोकजीवन याची महती सांगणारे गीतकार सुभाष लाड यांनी लिहिलेले व भैरवी जाधव हिने गायलेले ‘माझं गाव हर्दखळे’ या गाण्याच्या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. ऐतिहासिक महादेवाच्या मंदिरापासून शाळेपर्यंत पारंपरिक वेशभूषेत शाळेतील मुले, पाहुणे मंडळी आणि ग्रामस्थ यांचा सहभाग असलेली ग्रंथ दिंडी आली. दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमात महिलांचे हळदीकुंकू, मुलांच्या नृत्याचा कार्यक्रम, स्मरणिकेचे प्रकाशन झाल्यानंतर या शाळेतून सेवा करून गेलेल्या शिक्षकांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.अनेक माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
अत्यंत दुर्गम भागात असलेल्या या शाळेचे भव्य पटांगण , सभोवार असलेली बाग, शाळेची रंगरंगोटी आणि अध्यापनपूरक सजावट पाहून ही शाळा कायमच आदर्श राहिली आहे, याची खात्री पटते. सौ. प्रिया मांडवकर या शाळेत दहा वर्षे शिक्षिका होत्या. त्यांनी या शाळेतील आठवणींना उजाळा देणारी लिहिलेल्या कवितेने स्मरणिकेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ती कविता अनेकांच्या भाषणात उद्धृत झाल्याने कार्यक्रमाची उंची वाढवली.