रत्नागिरी:- सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे फॉरेन्सिक ऑडिट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ताणतणावाच्या व्यवस्थापनाची यावर हॉटेल विवेक येथे चर्चासत्र घेण्यात आले.
प्रास्ताविक करताना शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांनी आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्त्व, त्यामुळे वाढणारे गुन्हे आणि फॉरेन्सिक ऑडिटची गरज आणि ताणतणावाच्या व्यवस्थापनाची गरज विशद केली.
प्रथम सत्रात सीए प्रसाद आचरेकर यांनी फॉरेन्सिक ऑडिटबद्दल बोलताना गेल्या तीन-चार वर्षांतील विविध संस्थांचे सर्वे दाखवत आर्थिक गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ तसेच आर्थिक गुन्हेगाराची मानसिकता विशद केली. घडलेल्या चार गुन्ह्यांची माहिती दिली आणि पुरावे कसे गोळा केले जातात, तेही सांगितले. या सत्राला सीए अक्षय जोशी हे अध्यक्ष होते.
दुसऱ्या सत्रात नागपूरचे सीए अभिजित केळकर यांनी येत्या काळात सीएंनी एकत्र येणे कसे गरजेचे आहे आणि त्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करता येऊ शकतो, हे सांगितले. तिसऱ्या सत्रात त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सगळ्याच क्षेत्रात बदल होत असून आपण या बदलांचा अभ्यास करून त्याचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले. या दोन्ही सत्रांसाठी अध्यक्ष म्हणून सीए आनंद पंडित यांनी मार्गदर्शन केले.
चौथ्या सत्रात रत्नागिरीतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कृष्णा पेवेकर यांनी मार्गदर्शन केले. तणावांची विविध कारणे, त्यातून होणारे इतर आजार व हे सगळे कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. एक डॉक्टर म्हणून डॉक्टर्स डे हा सीए डेसोबत शेअर करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाला रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा सीए अभिलाषा मुळ्ये, उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, खजिनदार सीए अक्षय जोशी व सदस्य सीए मुकुंद मराठे, अनेक सीए व करसल्लागार उपस्थित होते. सीए मोनाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.