नागरिकांना पाणीटंचाई भेडसावल्यास पाणीपुरवठा विभागाचे श्राद्ध घालणार;गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांचा इशारा
संगमेश्वर:-संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेची रखडलेली कामे आगामी उन्हाळ्याआधी पूर्ण करण्यासाठी संबंधित जिल्हा व तालुका अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत स्तरावर लक्ष घालावे अशी मागणी गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी केली आहे.
प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळावे या चांगल्या उद्देशाने केंद्र सरकारने जल जीवन मिशन योजना राबवली मात्र या चांगल्या योजनेचा बट्ट्या बोल करण्याचे काम अनेक भागात सुरू असून नागरिकांना घरपट नळ कनेक्शन अद्यापही मिळालेली नाहीत. ज्या पद्धतीने या योजनेची कामे काही भागात सुरू आहेत ते पाहता जलजीवन मिशन योजना ही पैसे कमाऊ मिशन योजना झाली आहे काय असा प्रश्न पडतो.खरंतर जिल्हा आणि तालुकास्तरावरील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठीचे नियोजन केले जाते का याची पाहणी करणे आवश्यक होते. मात्र स्वतः खुर्च्या उबवणाऱ्या अधिकाऱ्यांनी या चांगल्या योजनेचा फज्जा उडवण्यासाठी पुढाकार घेतलाय का असा प्रश्न पडतो असेही उदय गोताड यांनी म्हटले आहे. आगामी उन्हाळ्याआधी संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये जलजीवन मिशन योजना अद्यापही अपूर्ण आहेत त्या पूर्ण करण्यासाठी चे प्रयत्न संबंधित तालुका अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी करावेत अशी विनंती उदय गोताड यांनी केली आहे.
जल जीवन मिशन योजना असतानाही या उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास पाणीपुरवठा विभागाचे गाव विकास समितीच्या माध्यमातून श्राद्ध घालणार
– अध्यक्ष उदय गोताड यांचा इशारा
जर यावर्षी उन्हाळ्यात रत्नागिरी जिल्हा व संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईची समस्या भेडसावली तर पाणीपुरवठा विभागाचे श्राद्ध गाव विकास समितीच्या माध्यमातून घालण्यात येईल असा इशाराही उदय गोताड यांनी दिला आहे. जलजीवन मिशन योजना या चांगल्या पद्धतीने राबवून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित आहे. नागरिकांना घरपट नळ कनेक्शन देऊन मुबलक पाणी या योजनेतून देणे अपेक्षित असताना ज्या ठिकाणी जलजीवन मिशन योजना फेल ठरतील त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर टाकावी असेही उदय गोताड यांनी म्हटले आहे. जर आगामी उन्हाळ्यामध्ये संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास यावर्षी पाणीपुरवठा विभागाचे श्राद्ध गाव विकास समिती मार्फत घालण्यात येईल असा इशाराही उदय गोताड यांनी दिला आहे.