रत्नागिरी: पाच वर्ष रखडलेले हायटेक मुख्य बसस्थानकाचे काम अवघ्या वर्षभरात पूर्णत्वाकडे गेले आहे. ९० टक्के काम झाले असून, दोन महिन्यात हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत उतरणार आहे. दोनमजली असलेले हे बसस्थानक सर्वसोयींनी युक्त आहे.
शहरातील मुख्य बसस्थानकाचे काम पाच वर्षे रखडले होते. सुरवातीला दहा कोटींमध्ये होणारे हे बसस्थानक कोरोना महामारीमध्ये अडचणीत आले. काही वर्षे ते काम बंद होते. त्यानंतर या कामाची अंदाजित रक्कम वाढत गेली. ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला. या दरम्याने रखडलेल्या बसस्थानकाच्या कामाबाबत अनेक आंदोलने झाली. मनसेनेदेखील काम लवकरात लवकर न झाल्यास या जागेत गोठा म्हणून आम्ही गुरे बांधू, असा इशारा दिला होता. पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरही टीका झाली होती तेव्हा सामंत यांनी एका वर्षामध्ये एसटी बसस्थानकाचे काम पूर्ण करून दाखवू, असा शब्द दिला. त्यानुसार त्यांनी या कामाचे वाढीव अंदाजपत्रकासह नव्याने निविदा मागवण्यात आल्या. येथील निर्माण ग्रुपला हे काम दिले. सुमारे २० कोटी रुपयांचे हे काम आहे. त्यासाठी निर्माण ग्रुपच्या अधिकाऱ्यांशी उदय सामंत आणि किरण सामंत यांनी बैठक घेतली. त्यांनी या कामाबाबत ठेकेदार कंपनीला टाईमबाऊंड दिला. त्यानुसार कंपनीने काम सुरू केले. पाच वर्षे रखडलेले हे काम वर्षामध्ये पूर्ण होत आले आहे. ९० टक्के बसस्थानकाचे काम झाले आहे. मार्च महिन्यात सर्व काम पूर्ण होऊन एप्रिल २०२५ मध्ये बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत उतरणार आहे.
‘या’ आहेत सुविधा
बसस्थानकाचे काम दोन मजली आहे. यामध्ये तळमजल्यावर शहरी बसवाहतूक, पहिल्या मजल्यावर ग्रामीण आणि दुसऱ्या मजल्यावर एसटीचे कार्यालय असणार आहे. सुमारे ३२ हजार स्क्वेअर फूटमध्ये संपूर्ण बांधकाम आहे. यामध्ये २४ गाळे, महिलांसाठी हिरकणी कक्ष, दोन कंट्रोलरूम, दोन पोलिसचौकी, चालक-वाहकांना रेस्टरूम, महिलांसाठी वेगळी रूम, दोन उपहारगृह आदी सुविधा देण्यात येणार आहेत.
हायटेक बसस्थानकाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. दोन महिन्यात ते प्रवाशांच्या सेवेत उतरेल. जास्तीत जास्त लवकर हे काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुमारे ३२ हजार स्क्वेअरफूटचे हे काम आहे.
–अनिल कांबळे, निर्माण ग्रुप, रत्नागिरी