रत्नागिरी:- मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या एजंटांच्या जाचामुळे रत्नागिरी जिह्यातील महिला त्रस्त झाल्या असून याविरोधात 2 मार्च रोजी रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात सकाळी 11 वाजता या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिह्यातील हजारो महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळय़ात फसल्या असून यातून बाहेर कसे पडायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अनेक महिलांना पहिले कर्ज फिटण्यापूर्वी दुसरे, तिसरे कर्ज कंपन्यांनी दिले आहे. तसेच एकाच वेळी आठ-दहा कंपन्यांनी एकेका महिलेला कर्ज दिले आहे. त्यामुळे ज्यांचे मासिक उत्पन्न पाच-दहा हजार रुपये नाही अशा महिलांना दरमहा दहा-पंधरा हजार ते अगदी तीस-चाळीस हजारांपर्यंत हप्त्यापोटी भरावे लागत आहेत.
त्यातच कर्जफेडीसाठी कंपन्यांच्या एजंटांकडून दादागिरी केली जात असल्याने घरातील दागिने विकून, जमीन, आंब्याच्या बागा गहाण ठेवून अनेक महिलांनी हप्ते भरले आहेत. पर्याय न राहिल्यामुळे तसेच वसुली एजंट दारात येऊन बसत असल्यामुळे अनेक महिलांनी मासिक 10 टक्के दराने सावकारी कर्ज घेऊन कर्जाचे हप्ते भरले आहेत, परंतु त्यामुळे अशा महिला अधिकच अडचणीत आल्या आहेत.
सरकारी बँका, सहकारी बँका, पतपेढय़ा यांच्या तुलनेत मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्याजाचे दर खूपच अधिक आहेत. याशिवाय साधारण 10-12 टक्के रक्कम वेगवेगळय़ा नावाखाली कापली जाते, त्यामुळे व्याजदर जास्त पडतो. कर्जाचा हप्ता दर आठवडय़ाला, पंधरा दिवसाआड असे भरावे लागत असल्यामुळे महिला कायम विवंचनेत असतात! यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करण्यासारख्या घटनाही घडल्या असून किमान एका महिलेने यात जीव गमावला आहे.
या पार्श्वभूमीवर या महिलांच्या परिस्थितीकडे राज्य सरकार, रिझर्व्ह बँक तसेच स्थानिक पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी 2 मार्च रोजी जनता दल सेक्युलर पक्ष आणि कोकण जनविकास समितीच्या माध्यमातून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी जनता दलाचे प्रभाकर नारकर, संजय परब, नम्रता जाधव, प्रकाश लवेकर, संजीवकुमार सदानंद, कोकण जनविकास समितीचे जगदीश नलावडे, सुरेश रासम, अॅड. प्रशांत गायकवाड, संग्राम पेटकर आदी उपस्थित राहणार आहेत.