मुंबई:- स्वप्ननगरी मुंबईत हक्काची घरे असावीत अशी सर्वसामान्य नागरिकांची इच्छा असते. मात्र वाढत्या महागाईमुळे घर घेणं शक्य नसते. धीम्या गतीनं होणाऱ्या या पगारवाढीमुळं अनेक स्वप्नांची पूर्तताही लांबणीवर पडते.
हक्काच्या घरांसंदर्भातही अनेकदा हेच घडतं. मनाजोग्या ठिकाणी घर नाही, मनाजोगा परिसर नाही या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिशाला परवडणारी किंमत नाही अशा कैक कारणांमुळं स्वप्नातील घर खरेदी लांबणीवर पडत जाते. मात्र, ठाण्यात म्हाडा लवकरच २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. म्हाडाकडे कोकण मंडळाच्या २१४७ सदनिका आणि भूखंड विक्रीकरिता सुमारे २४, ९२२ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले होते. ही सोडत निघाली त्यात अनेकांचा हिरमोड झाला होता. परंतु आता म्हाडाने नवीन घरांची योजना आखली आहे.
कोकण मंडळाने पुन्हा नवीन घरांची योजना आखली आहे. येत्या काही महिन्यात म्हाडाचे कोकण मंडळ २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. यात ठाण्यातील चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच ११७३ घरांचा समावेश असणार आहे. गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळानं तीन सोडत काढल्या होत्या. ज्यात सुमारे १० हजार जणांचे घराचे स्वप्न पु्र्ण झाले होते. या वर्षीही सुमारे २ हजार घरांची सोडत काढण्याची तयारी कोकण मंडळाने दर्शवली आहे.
यात ठाण्यातील चितळसर येथे उभारलेल्या ११७३ घरांसह १५ टक्के गृहनिर्माण योजनेअंतर्गत आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत हाऊसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचा समावेश असणार आहे. म्हाडानं चितळसर येथे २२ मजल्याच्या ७ इमारती तयार केल्या आहेत.परंतु चितळसर या भागात पाणी आणि रस्त्याची समस्या आहे. ठाणे महानगरपालिकेनं अद्याप या इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र दिलं नसल्यानं सोडतीचं काम रखडलंय. ना हरकत प्रमाणपत्र मिळताच येथील घरे सुद्धा लॉटरीमध्ये येतील. अशी माहिती मिळाली आहे.