चिपळूण : परशुराम घाटातील सवडसडा परिसरात रविवारी दुपारी भीषण वणवा लागला. या आगीत नुकसान झाले. मात्र माहिती मिळताच चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत वणवा आटोक्यात आणल्याने अनर्थ टाळला.
रविवारी परशुराम घाटात सवतसडा समोरील बाजूस भरदुपारी वणवा लागल्याची घटना घडली. स्थानिकांनी याबाबतची माहिती पर्यावरणप्रेमी व जलदूत शाहनवाज शाह यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अग्निशमन विभागाचे अमोल वीर यांच्याशी संपर्क साधत अग्निशमन बंब पाठविण्याची मागणी केली. वणव्याची माहिती मिळताच या अधिकाऱ्यांनी तातडीने बंब परशुराम घाटाच्या दिशेने पाठवला. यावेळी उन्हामुळे वणवा भडकला होता. फायरमन देवदास गावडे, प्रतीक घेवडेकर यांच्यासह वाहनचालक महेंद्र कदम यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. जवळपास अडीच तासानंतर त्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.