नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संस्थेच्यावतीने आ. शेखर निकम यांच्याकडे मागणी
नमन कला व कलाकारांच्या हितासाठी विविध मागण्यांचे निवेदन
चिपळूण:- राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेसाठी दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून वेगवेगळ्या कला प्रकारातून अनेक प्रस्ताव येतात. त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रस्ताव मंजूर होतात. त्यामुळे नमन लोककला मंडळ रत्नागिरी संस्थेच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील शंभर प्रस्तावांची मर्यादा पाचशेपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली.
नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संस्थेच्यावतीने सावर्डे येथे नुकतीच आमदार शेखर निकम यांची संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि सर्व पदाधिकारी यांनी भेट घेतली. कलावंतांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी निवेदन सादर केले. नमन लोककलेच्या संवर्धनासाठी काही मागण्या त्यांच्यामार्फत शासनाकडे पोहोचवण्याकरता हे निवेदन देण्यात आले.
त्यामध्ये सर्वात प्रथम राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन प्रस्तावांची संख्या १०० वरून ५०० एवढी रत्नागिरी जिल्ह्यासाठी करावी अशी महत्त्वपूर्ण मागणी केली. तसेच वृद्ध मानधन कलाकार योजनेला जो लाभार्थी किंवा कलाकार अर्ज करतो. त्या कलाकाराला एक कलाकार म्हणून एका संस्थेचे शिफारस पत्र जोडावे लागते. त्यामुळे जो लाभार्थी ज्या कलाप्रकारातून प्रस्ताव करणार असेल त्याच कलेच्या प्रकारातील रजिस्टर संस्थेचे व सतत कार्यरत असलेल्या संस्थेचे शिफारस पत्र जोडणे योग्य ठरेल. यासाठी सुद्धा प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक सांस्कृतिक नमन भवन होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली.
आमदार शेखर निकम यांना निवेदन देतेवेळी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे, उपाध्यक्ष मोहन घडशी, सचिव परशुराम मासिये, श्री. आर्ते, जिल्हा सहसचिव पत्रकार संतोष कुळे, चंद्रकांत पालकर, सचिन काष्टे, संजय भागडे, सुरेश होरंबे, रवींद्र कोटकर, श्रीकांत बोंबले, श्रीधर खापरे, संदेश वाघे, भिकाजी भुवड, विश्वनाथ गावडे, विलास भाताडे, अमोल खांबे, भाऊ हरमले, शिवाजी मासिये, गांगरकर आदी उपस्थित होते.